पाकिस्तानात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालाय. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील सरकार बरखास्त करून तिथे आणीबाणी लागू केलीय. यासाठी पोलीस आणि लष्कराची मदत घेतली जातेय.

इस्लामाबाद (११ ऑक्टोबर): पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून मोठ्या संकटात अडकलाय. राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या देशाची अवस्था खूपच वाईट झालीय. याच गोंधळात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतातलं सरकार थेट बरखास्त केलंय आणि तिथे आणीबाणी लागू केलीय. इम्रान खान यांच्या पीटीआय (PTI) पक्षाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आलीय.

आणीबाणी का लागू केली?

खैबर पख्तुनख्वा प्रांतात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाची सत्ता होती. पण, पीटीआयने तिथे आंदोलन तीव्र केल्यामुळेच ही आणीबाणी लागू करण्याची वेळ आलीय. इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी पीटीआय कार्यकर्त्यांनी खैबर पख्तुनख्वामध्ये मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात इम्रान खान यांचे हजारो समर्थक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. लवकरच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे असाच मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या सूचनेनुसार, राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी सरकार बरखास्त करून आणीबाणीची घोषणा केली.

पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पीटीआयमध्ये संघर्ष

इम्रान खान यांच्या सुटकेसाठी खैबर प्रांतात रोज आंदोलने होत आहेत. आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतेय आणि लोकांची गर्दीही उसळतेय. लोक इम्रान खान यांच्या समर्थनार्थ आणि शाहबाज शरीफ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. यामुळे सरकारचं टेन्शन वाढलं होतं. इम्रान खान तुरुंगात असले तरी त्यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही, याची जाणीव झरदारी यांना झाली होती. त्यामुळेच तातडीने पावलं उचलत खैबर प्रांतातील पीटीआय सरकार बरखास्त करून तिथे आणीबाणी लागू करण्यात आली.

पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचं स्पष्टीकरण

खैबर पख्तुनख्वामधील सरकार बरखास्ती आणि आणीबाणीबाबत आसिफ अली झरदारी यांच्या कार्यालयाने एक पत्रक काढलंय. पाकिस्तानच्या राज्यघटनेतील कलम २३२ आणि २३४ अंतर्गत ही आणीबाणी लागू करण्यात आलीय. खैबर प्रांतातील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेऊन शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळाने बैठक घेतली आणि हा मोठा निर्णय घेतला. शाहबाज शरीफ यांनीच खैबर प्रांतातील सरकार बरखास्त करून आणीबाणी लागू करण्याची शिफारस केली होती. या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात आल्याचं झरदारी यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलंय.

दुसरीकडे, इम्रान खान यांचे जवळचे सहकारी झुल्फिकार बुखारी यांनी या आणीबाणीवर तीव्र संताप व्यक्त केलाय. हे सूडाचं राजकारण असल्याचं ते म्हणाले. पाकिस्तानच्या सर्व प्रांतांपैकी फक्त खैबरमध्येच जनतेने निवडून दिलेलं कायदेशीर सरकार होतं, आणि आता तेच बरखास्त करून आणीबाणी लादण्यात आलीय, असा आरोप बुखारी यांनी केलाय.