Nigerian Airstrike : नायजेरियाच्या ईशान्य भागातील योबे राज्यात लष्कराने दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी केलेला हवाई हल्ला चुकला. हा बॉम्ब थेट एका गजबजलेल्या बाजारात पडला, ज्यात महिला आणि मुलांसह 100 हून अधिक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला.
Nigerian Airstrike : नायजेरियाच्या ईशान्य भागात दहशतवाद्यांना संपवण्यासाठी लष्कराने केलेला हवाई हल्ला चुकून सामान्य नागरिकांवरच बेतला. लष्कराने टाकलेलं क्षेपणास्त्र थेट एका गजबजलेल्या बाजारात पडल्याने 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. शनिवारी योबे राज्यातील एका गावात ही दुर्दैवी घटना घडली. नायजेरियन हवाई दलाने दहशतवाद्यांच्या ठिकाणावर क्षेपणास्त्र डागलं होतं, पण त्याचा निशाणा चुकला.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. योबे राज्यातील गिल्ली गावात आठवडी बाजार भरला होता, अगदी आपल्याकडच्या गावांमध्ये जसा भरतो तसाच. त्याचवेळी हा हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचंही अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने स्पष्ट केलं आहे. अॅम्नेस्टी नायजेरियाचे संचालक इसा सानुसी म्हणाले, "आम्ही हॉस्पिटल आणि पीडितांकडून माहिती गोळा केली आहे. आमच्याकडे मृतांमध्ये लहान मुलांचे फोटोही आले आहेत."
योबे राज्य सरकारने लष्करी कारवाई झाल्याचं मान्य केलं आहे. "एका दहशतवादी तळाला लक्ष्य करण्यात आलं होतं, पण दुर्दैवाने बाजारात आलेल्या काही लोकांना त्याचा फटका बसला," असं सांगत अधिकाऱ्यांनी लष्कराकडून चूक झाल्याचं कबूल केलं. मात्र, त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
दुसरीकडे, नायजेरियन लष्कराने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, 'मोटारसायकलवरून फिरणाऱ्या दहशतवाद्यांचा एक तळ यशस्वीरित्या उद्ध्वस्त केला.' पण बाजारात बॉम्ब पडल्याचा कोणताही उल्लेख लष्कराच्या निवेदनात नाही. नायजेरियात बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनांविरोधात लष्कर सातत्याने हवाई हल्ले करत असतं. पण अशा चुकलेल्या हल्ल्यांमुळे 2017 पासून आतापर्यंत 500 हून अधिक सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या ताज्या घटनेची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने केली आहे. तर, आपत्कालीन व्यवस्थापन संस्थांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.


