टाटा ग्रुपच्या मालकीची एअर इंडिया २०२५-२६ या आर्थिक वर्षात २२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसानीत गेली आहे. यामुळे आता टाटा समूहाने आपला खर्च कमी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक म्हणजे एअर इंडिया! टाटा ग्रुपच्या मालकीची ही मोठी कंपनी सध्या प्रचंड नुकसानीत चालली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात कंपनीला तब्बल ₹२२,००० कोटींहून अधिक नुकसान सोसावे लागले आहे.

वाढणारे एटीएफ (विमान इंधन) दर हे कंपनीच्या या वाईट स्थितीचे प्रमुख कारण आहे. यासोबतच पाकिस्तानलाही यासाठी जबाबदार धरले जात आहे. दीड वर्षापूर्वी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द वापरण्यास बंदी घातली आहे. यामुळे विमान प्रवासाचा खर्च वाढला असून लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही याचा परिणाम झाला आहे.

नुकसानीतून बाहेर येण्यासाठी टाटा ग्रुपचा प्लॅन

या मोठ्या नुकसानीनंतर टाटा ग्रुप आता सतर्क झाला आहे. त्यांनी एअर इंडियाचे कामकाज आणि खर्चाचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या संचालक मंडळाची बैठक झाली. खर्च कमी करणे, कामकाजात सुधारणा करणे आणि एअर इंडिया एक्स्प्रेससोबत समन्वय वाढवणे अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

इंधनाचे वाढते दर ही एअर इंडियासाठी सर्वात मोठी समस्या ठरत आहे. यामुळे विमानांचा खर्च वाढला आहे. पाकिस्तानने भारतीय विमानांवर आपली हवाई हद्द वापरण्यावर बंदी घातल्याने एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय विमानांना पर्यायी मार्ग वापरावे लागत आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा खर्च या दोन्ही गोष्टी वाढत आहेत.

पुढचा प्लॅन काय?

कंपनीचे नुकसान कमी करण्यासाठी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये चांगला समन्वय साधण्याचा विचार सुरू आहे. दोन्ही कंपन्यांचे काही कामकाज एकत्र करून खर्च कमी करता येईल, असा कंपनीचा अंदाज आहे.

एअर इंडियाचे नवीन सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक टेवोल्डे गेब्रेमरियम यांनी १ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी कंपनीचा खर्च कमी करण्यावर भर दिल्याचे समजते. यासाठी त्यांनी एका खास टीमची स्थापना केली असून ही टीम खर्च कसा कमी करता येईल यावर काम करेल.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, नोएल टाटा आणि संचालक मंडळाच्या इतर सदस्यांनी काल गुरुग्राममधील एअर इंडियाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. तिथे त्यांनी कंपनीचे कामकाज, प्रशिक्षण अकादमी आणि ऑपरेशन कंट्रोल सेंटरची पाहणी केल्याचे वृत्त आहे.