लॉस एंजेलिसमध्ये एका ३५ वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीचा पोलिसांनी गोळीबार करून मृत्यू झाला. हा व्यक्ती हातात तलवार घेऊन रस्त्यावर फिरत होता आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करत नव्हता.

लॉस एंजेलिस पोलिस विभागाने (LAPD) नुकताच एक बॉडीकॅम व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये ३५ वर्षीय भारतीय वंशाचे गुरप्रत सिंह नावाचे व्यक्ती हातात मोठी तलवार (मशेटी) घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. ते पारंपरिक सिख मार्शल आर्ट गटकासारख्या हालचाली करत असून त्यामुळे रस्त्यावर गोंधळ उडाला आहे.

नेमकं काय झालं? 

१३ जुलै रोजी सकाळी सुमारे ९ वाजता, गुरप्रत सिंह यांनी क्रिप्टो.कॉम एरेना जवळ आपली गाडी थांबवली. ते गाडीतून खाली उतरले आणि हातात तलवार घेऊन रस्त्यावर हातवारे करायला लागले. हे पाहून नागरिकांनी घाबरून ९११ वर पोलिसांना फोन करून माहिती दिली.

पोलिसांनी केली कारवाई 

घटनास्थळी दोन पोलिस अधिकारी लगेच पोहोचले. त्यांनी गुरप्रत सिंह यांना वारंवार तलवार खाली ठेवण्याचे आदेश दिले. पण त्यांनी आदेशाचे पालन केलं नाही. उलट त्यांनी पोलिसांकडे बाटली फेकली आणि पुन्हा गाडीत बसून पळ काढला. यावेळी त्यांनी गाडीने वेगाने जाऊन अनेक वाहनांना आणि पोलिसांच्या गाडीला धडक दिली.

गोळीबाराची वेळ कोणती होती? 

थोड्याच वेळात, फिगुएरा व १२व्या रस्त्याजवळ त्यांनी पुन्हा गाडी थांबवली. ते तलवार हातात घेऊन पोलिसांच्या दिशेने धावू लागले. त्याच क्षणी दोन्ही पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला. यात गुरप्रत सिंह गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

लोकांची काय प्रतिक्रिया आली?

या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही लोक विचारत आहेत की पोलिसांनी टेझर किंवा इतर कमी घातक शस्त्रांचा वापर का केला नाही? तर काहींच्या मते, पोलिसांनी मानसिक आरोग्याशी संबंधित बाबींकडेही लक्ष द्यायला हवे होते. मात्र, गुरप्रत सिंह यांची मानसिक स्थितीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

तपास सुरू 

सध्या LAPD ची फोर्स इन्व्हेस्टिगेशन डिव्हिजन या घटनेची चौकशी करत आहे. लॉस एंजेलिसमध्ये प्रत्येक पोलिसीय गोळीबारानंतर अशी चौकशी केली जाते. अधिकाऱ्यांनी सांगितले की तपास पारदर्शक असेल आणि संबंधित माहिती वेळोवेळी जाहीर केली जाईल.