लिओनेल मेस्सीने बेनिनविरुद्ध ३-० असा विजय मिळवत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निरोप घेतला. पण या सामन्यानंतर कडक सुरक्षेमुळे बेनिनच्या खेळाडूंना मेस्सीसोबत फोटो काढता आले नाहीत आणि जर्सीही बदलता आली नाही. यावरून बेनिनचे कोच चांगलेच संतापले आहेत.
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या निरोप समारंभाच्या सामन्यानंतर मैदानाबाहेर एकच वाद सुरू झालाय. बेनिन टीमने अर्जेंटिनाच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ब्युनोस आयर्सच्या एस्टाडिओ मोन्युमेंटल स्टेडियमवर अर्जेंटिना आणि बेनिन यांच्यात एक फ्रेंडली मॅच झाली. या मॅचमध्ये मेस्सीने एक गोल करत अर्जेंटिनाला ३-० असा दणदणीत विजय मिळवून दिला आणि आंतरराष्ट्रीय करिअरचा शेवट गोड केला.
मेस्सीने आपल्या शानदार आंतरराष्ट्रीय करिअरचा शेवट अगदी एखाद्या चित्रपटासारखा केला. त्याने ७१ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. त्याआधी ४८ व्या मिनिटाला निकोलस ओटामेंडी आणि ६१ व्या मिनिटाला निको पाझ यांना गोल करण्यासाठी शानदार पास दिले. स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या ८५,००० हून अधिक चाहत्यांसमोर ही रात्र खूपच भावुक करणारी ठरली.
एस्टाडिओ मोन्युमेंटल स्टेडियमवर मेस्सीला निरोप देताना सगळेच भावुक झाले होते. पण दुसरीकडे, मैदानाबाहेर बेनिनच्या टीमला मात्र यजमान अर्जेंटिनाकडून मिळालेल्या वागणुकीमुळे खूप राग आला होता. त्यांना साधी भेट घेण्याचीही परवानगी दिली गेली नाही.
'काहीच उपयोग झाला नाही'
ब्युनोस आयर्समध्ये झालेल्या या सामन्यानंतर बेनिनच्या खेळाडूंना मेस्सीला त्याच्या शानदार करिअरबद्दल शुभेच्छा द्यायच्या होत्या. पण स्टेडियमची कडक सुरक्षा आणि टीमच्या नियमांमुळे त्यांना मेस्सीपर्यंत पोहोचताच आलं नाही.
'आरएमसी स्पोर्ट'शी बोलताना बेनिनचे कोच गेर्नोट रोहर यांनी सांगितलं की, त्यांच्या खेळाडूंना अर्जेंटिनाच्या स्टार खेळाडूंना भेटायचं होतं, पण सुरक्षारक्षकांनी त्यांना अक्षरशः अडवून ठेवलं.
"माझ्या खेळाडूंनी खूप प्रयत्न केले, पण काहीच उपयोग झाला नाही. अर्जेंटिनाच्या लोकांनी आमच्या खेळाडूंना काहीच दिलं नाही, अगदी मेस्सीसोबत एक फोटोही काढू दिला नाही," असं रोहर म्हणाले.
मेस्सीचा हा शेवटचा सामना असल्यामुळे स्टेडियममध्ये सुरक्षेचे कडक नियम पाळले जात होते. स्टेडियमच्या आत ८५,००० पेक्षा जास्त प्रेक्षक होते आणि बाहेरही मोठी गर्दी हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी जमली होती.
अर्जेंटिनाच्या बसमागे चाहत्यांची मोठी गर्दी होती. एस्टाडिओ मोन्युमेंटल स्टेडियमच्या बाहेरही लोकांचा महापूर आला होता. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी सगळीकडे कडक नाकाबंदी केली होती. सामन्यानंतर बेनिनच्या खेळाडूंनी मेस्सीशी थोडा वेळ संवाद साधला खरा, पण त्यांना कोणतीही आठवण म्हणून जर्सी किंवा इतर वस्तू दिली गेली नाही.
'सुरक्षारक्षक सर्वांना हाकलून लावत होते'
सामन्यानंतरच्या गोंधळाबद्दल बोलताना रोहर यांनी सांगितलं की, ड्रेसिंग रूम आणि प्लेअर टनेलजवळ उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांनी फोटो काढण्याची आणि जर्सी बदलण्याची साधी विनंतीही फेटाळून लावली.
"आम्हाला जर्सी बदलायची होती, पण आम्हाला काहीच मिळालं नाही. त्यांनी आम्हाला त्यांच्या प्लेअर कॉरिडॉरमध्येही जाऊ दिलं नाही. सुरक्षारक्षक सर्वांना हाकलून लावत होते. आमचे खेळाडू स्वतःची जर्सी घेऊन आले होते, जेणेकरून ते अर्जेंटिनाच्या खेळाडूंसोबत ती बदलू शकतील," असं रोहर यांनी स्पष्ट केलं.

पण बेनिनच्या कोचने सांगितलं की, त्यांना अर्जेंटिनाचे कोच लिओनेल स्कालोनी यांना भेटण्यासाठी तब्बल ३० मिनिटे वाट पाहावी लागली. त्यानंतर त्यांनी स्वतःसोबत आणलेल्या मेस्सीच्या एका जुन्या जर्सीवर ऑटोग्राफ मिळवला.
सामना सुरू होण्यापूर्वी बेनिनच्या राष्ट्रीय रंगांचा पुष्पगुच्छ देऊन अर्जेंटिनाचं स्वागत करण्यात आलं होतं. पण सामन्यानंतर मिळालेल्या या थंड वागणुकीमुळे बेनिनची टीम खूपच निराश होऊन परतली.
बेनिनच्या टीमने केलेल्या या आरोपांवर अर्जेंटिनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
