चीनमधील एका लग्नाचा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात नवरीने आपल्या नवऱ्याला लग्नात चक्क 'ASUS ROG Astral RTX 5090' ग्राफिक्स कार्ड गिफ्ट दिलं. हे महागडं आणि आपल्या आवडीचं गिफ्ट पाहून नवरदेवाला स्टेजवरच रडू कोसळलं.
लग्नाचा दिवस प्रत्येकासाठीच खूप भावनिक असतो. पण चीनमधल्या एका नवरदेवाच्या डोळ्यात चक्क एका 'टेक-गिफ्ट'मुळे पाणी आलं. नवरीने आपल्या नवऱ्याला लग्नात 'ASUS ROG Astral RTX 5090' हे ग्राफिक्स कार्ड सरप्राईज म्हणून दिलं. या घटनेचा एक जुना व्हिडिओ आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या मोठ्या गिफ्ट बॉक्समध्ये नेमकं काय आहे, हे समजताच नवरदेवाची काय अवस्था झाली, हे या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. एक्स (X) वर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जातोय. बायकोने दिलेलं हे सरप्राईज पाहून नवरदेवाला स्टेजवरच रडू कोसळलं. त्याने लगेच आपल्या बायकोला घट्ट मिठी मारली आणि तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
लग्नात सहसा दागिने, कपडे किंवा इतर महागड्या वस्तू गिफ्ट म्हणून दिल्या जातात. पण या नवरीने आपल्या नवऱ्यासाठी चक्क एक फ्लॅगशिप ग्राफिक्स कार्ड निवडलं. तिची ही भन्नाट आयडिया नेटकऱ्यांना खूपच आवडली आहे.
पीसी गेमर्ससाठी 'ASUS ROG Astral RTX 5090' हे एक स्वप्नच असतं. हे अत्यंत हाय-एंड आणि हाय-परफॉर्मन्स देणारं ग्राफिक्स कार्ड आहे. या कार्डची किंमत जवळपास ३००० डॉलर्स (सुमारे अडीच लाख रुपये) आहे आणि बाजारात ते सहजासहजी मिळतही नाही. त्यामुळे हे गिफ्ट फक्त महागडं नव्हतं, तर बायकोला आपल्या नवऱ्याच्या आवडीची किती अचूक माहिती आहे, हे दाखवून देणारं होतं.
पाहा व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या?
हा व्हिडिओ जुना असला तरी, तो पुन्हा एकदा लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडलाय. अनेकांनी या जोडीला 'रिलेशनशिप गोल्स' म्हटलं आहे.
एका युजरने लिहिलंय, "आता त्याला खात्री पटली असेल की त्याने अगदी योग्य मुलीशी लग्न केलंय." तर दुसऱ्या एकाने म्हटलंय, "तुम्ही तुमच्या जोडीदाराला किती चांगलं ओळखता, हे यातून दिसून येतं."
आणखी एका युजरने गमतीत लिहिलंय, "लग्नाच्या आणाभाका म्हणजे या क्षणासाठी फक्त एक लोडिंग स्क्रीन होती."






