अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन डब्लिनमधील ट्रिनिटी कॉलेजला भेट देत असताना प्रो-पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. आंदोलकांनी त्यांच्यावर दुधाचे डबे फेकले आणि युद्धविरोधी घोषणा देत, गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईला त्यांच्या प्रशासनाने दिलेल्या पाठिंब्याचा निषेध केला.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना आयर्लंडमध्ये प्रो-पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मंगळवारी, १० नोव्हेंबरला डब्लिनमध्ये त्यांच्या मोटारकेड आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलकांनी दुधाचे डबे फेकले.
जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन याला 'पब्लिक डिस्कोर्स' मधील उत्कृष्ट योगदानासाठी सुवर्णपदक दिले जाणार होते. त्यासाठी ते डब्लिनमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये पोहोचले होते. पण, सोहळ्याच्या आधीच फ्रंट स्क्वेअरबाहेर जमलेल्या संतप्त प्रो-पॅलेस्टिनी आंदोलकांनी त्यांना घेरले.
बायडेन, त्यांच्या पत्नी आणि मुलगा जेव्हा कोर्टयार्डमध्ये आले, तेव्हा सुरक्षा रक्षक आणि स्थानिक गार्डांनी तातडीने कुटुंबाभोवती सुरक्षाकडे केले. वाढत्या जमावापासून त्यांना वाचवत वेगाने एका गाडीत बसवण्यात आले.
बायडेन यांच्यावर दुधाचे डबे का फेकले?
बायडेन त्यांच्या पत्नी जिल यांच्यासोबत होते, तेव्हा डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेजच्या फ्रंट स्क्वेअरबाहेर प्रो-पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांच्या एका गटाने त्यांच्यावर दुधाचे डबे फेकले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच छत्र्या उघडून त्यांना कव्हर केलं आणि गाडीकडे धाव घेतली.
माजी राष्ट्राध्यक्षांवर दुधाचे डबे फेकण्यासोबतच, आंदोलकांनी 'जेनोसाईड जो' आणि 'तुमचे हात रक्ताने माखलेत' अशा घोषणा दिल्याची माहिती आहे. गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईला अमेरिकेने दिलेल्या लष्करी आणि राजनैतिक पाठिंब्याबद्दल त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
आंदोलकांनी त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा निषेध केला. प्रदेशातील वाढती नागरिक जीवितहानी आणि गंभीर मानवतावादी संकटासाठी थेट अमेरिका जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप होता. बायडेन यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात लष्करी मदत आणि राजनैतिक पाठिंबा देऊन गाझामधील इस्रायलच्या लष्करी मोहिमेला सक्षम केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.
आपल्या कार्यकाळात, बायडेन यांनी इस्रायलला अमेरिकेची लष्करी मदत सुरू ठेवली होती. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर त्यांनी शस्त्रास्त्रे पाठवली होती. गाझामधील नागरिक मृत्यू आणि मानवतावादी संकटाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांच्या प्रशासनाला वाढत्या टीकेचा सामना करावा लागला.
दरम्यान, ट्रिनिटी कॉलेज डब्लिनबाहेर झालेल्या चकमकीनंतर आयरिश पोलिसांनी (गार्डा) दोन आंदोलकांवर पेपर स्प्रे मारून त्यांना अटक केली.
बायडेन यांच्या अचानक डब्लिन भेटीने वाद आणि निदर्शने भडकली
हंटरच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जो बायडेन यांनी डब्लिनमधील ट्रिनिटी कॉलेजला दिलेली अचानक भेट त्यांच्याच अंगलट आली. एका खाजगी कौटुंबिक सोहळ्याचे रूपांतर तीव्र राजकीय निदर्शनांमध्ये झाले.
निदर्शनादरम्यान, ट्रिनिटी कॉलेज डब्लिन स्टुडंट्स युनियन (TCDSU) च्या अध्यक्षा एमी केनेडी यांनी फ्रंट स्क्वेअरबाहेर भाषण करताना बायडेन यांच्या भेटीचा कडक शब्दांत निषेध केला. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या सोसायट्यांनी गाझामधील परराष्ट्र धोरणाच्या निर्णयांसाठी जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ नये.
“पॅलेस्टिनी लोकांच्या नरसंहारात जो बायडेन यांची भूमिका जगजाहीर आहे,” असे केनेडी म्हणाल्या.
“शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलन मोडण्यासाठी गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा गार्डाला बोलावण्यात आलं आहे," असेही त्यांनी जोडले.
एमी केनेडी यांनी मागणी केली की, शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलन दडपण्यासाठी कॅम्पसमध्ये गार्डांना बोलावण्याच्या निर्णय प्रक्रियेची ट्रिनिटी कॉलेजने संपूर्ण चौकशी करावी. तसेच २०१६ मध्ये जो बायडेन यांना दिलेली मानद डॉक्टरेट पदवी मागे घ्यावी, असे आवाहन त्यांनी विद्यापीठ अधिकाऱ्यांना केले.
दरम्यान, जो बायडेन किंवा त्यांच्या कुटुंबाने, विशेषतः त्यांचा मुलगा हंटर याने अद्याप डब्लिन भेटीवरील वाद किंवा निदर्शनांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.












