iPhone 17e: हा स्मार्टफोन त्याच्या मागील 16e मॉडेलपेक्षा मोठ्या अपग्रेडसह येणार आहे. डायनॅमिक आयलँड, A19 बायोनिक चिप, 25W मॅगसेफ चार्जिंग ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
iPhone 17e: कॅलिफोर्निया: एखाद्या व्यक्तीकडे iPhone असणे हा स्टेटस सिम्बल मानले जाते. हा Apple इंक कंपनीने विकसित केलेला एक प्रिमियम स्मार्टफोन आहे, जो स्वतःच्या iOS ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. 2007 मध्ये लाँच झालेला हा फोन त्याच्या उच्च दर्जाचा कॅमेरा, उत्कृष्ट सुरक्षा (Security), वेगवान परफॉर्मन्स आणि ॲपल इकोसिस्टमसाठी ओळखला जातो. हे फोन प्रामुख्याने त्यांच्या आयफोन 15, 16, आणि आगामी 17 सिरीजसाठी प्रसिद्ध आहेत. आयफोन महाग असतात, परंतु दीर्घकाळ टिकणारे सॉफ्टवेअर अपडेट्स त्यांना फायदेशीर ठरवतात.
ॲपलचा बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन मानला जाणारा iPhone 17e, 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाँच होणार असल्याची माहिती लीक झाली आहे. हा नवीन फोन सुधारित A19 चिप, डायनॅमिक आयलँड आणि मॅगसेफ चार्जिंग तंत्रज्ञानासह बाजारात येईल, असे 'ॲपल ट्रॅक'ने एक्सवर (X) पोस्ट केले आहे. टिपस्टर अभिषेक यादव यांनीही iPhone 17e 19 फेब्रुवारीला लाँच होईल असे म्हटले आहे. मात्र, प्रीमियम स्मार्टफोन्सप्रमाणे ॲपल iPhone 17e साठी कोणताही विशेष लाँच कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे.
लीक झालेल्या माहितीनुसार, iPhone 16e च्या तुलनेत 17e मॉडेलमध्ये कंपनी अनेक मोठे अपग्रेड देणार आहे. यात डायनॅमिक आयलँड, A19 बायोनिक चिप, 25W पर्यंत फास्ट मॅगसेफ चार्जिंग, C1X मॉडेम (दुसरी पिढी) आणि N1 वायरलेस नेटवर्क चिप यांसारखे अपग्रेड्स असतील. एवढ्या मोठ्या अपग्रेड्सनंतरही, डिस्प्ले रिफ्रेश रेट 60Hz वरच राहणार आहे, ही गोष्ट iPhone 17e खरेदीची वाट पाहणाऱ्यांसाठी निराशाजनक ठरू शकते.
iPhone 17e मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असेल का?
iPhone 17e लाँच झाल्यावर त्यात ड्युअल रिअर कॅमेरा असेल की नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र, टिपस्टर अभिषेक यादव यांच्या मते, या फोनमध्ये फक्त एकच रिअर कॅमेरा असेल. ही बाब iPhone 17e खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना निराश करू शकते.
मागील वर्षी ॲपलने आपली iPhone SE मालिका बंद करून त्याऐवजी 'e' मालिका सादर केली होती. या मालिकेतील पहिला फोन iPhone 16e, फेब्रुवारी 2025 मध्ये लाँच झाला होता. iPhone 16e मध्ये फक्त 7.5 वॅट फास्ट Qi 1 चार्जिंग सिस्टीम होती. याच्या तुलनेत, iPhone 17e मध्ये चार्जिंगच्या बाबतीत मोठ्या अपग्रेडची अपेक्षा आहे. iPhone 16e मध्ये A18 चिप, 48MP सिंगल रिअर फ्यूजन कॅमेरा आणि 12MP सेल्फी कॅमेरा ही प्रमुख वैशिष्ट्ये होती.


