मँचेस्टर युनायटेडचे माजी मॅनेजर एरिक टेन हॅग आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील वाद जगभरात गाजला होता. आता चार वर्षांनंतर डच कोचने यावर मौन सोडलं असून रोनाल्डोवर जोरदार टीका केली आहे.

मँचेस्टर युनायटेडमध्ये (Manchester United) ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) दुसऱ्या पर्वाच्या शेवटी जो वाद झाला होता, त्यावर तत्कालीन मॅनेजर एरिक टेन हॅग यांनी आता मौन सोडलंय. त्यांनी रोनाल्डोवर सडकून टीका केली आहे. या पोर्तुगीज दिग्गजाच्या व्यावसायिकतेवर आणि फिटनेसवर डच मॅनेजरने प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. रोनाल्डोने मला आणि मॅन युनायटेडला बुडवलं, असा दावा त्यांनी केलाय. टेन हॅग यांच्या मते, वैयक्तिक यश आणि स्टारडमपेक्षा संघाचं हित जास्त महत्त्वाचं असतं. २०२२ च्या फिफा वर्ल्ड कपनंतर (FIFA World Cup 2022) रोनाल्डोने मॅन युनायटेड सोडलं. टेन हॅग यांच्यासोबतचा वाद हेच यामागचं मुख्य कारण होतं. एका मुलाखतीत या पोर्तुगीज सुपरस्टारने मॅन युनायटेडच्या मॅनेजरवर आगपाखड केली होती. आता चार वर्षांनंतर डच मॅनेजरने त्याला सडेतोड उत्तर दिलंय.

रोनाल्डोवर टेन हॅग यांची टीका

रोनाल्डोवर निशाणा साधत टेन हॅग म्हणाले, 'त्याने संघाला बुडवलं, मलाही बुडवलं. कारण, आम्ही त्याला केंद्रस्थानी ठेवूनच प्लॅनिंग केलं होतं. मी त्याला अनेकदा सांगितलं होतं की, 'रॉनी, तुला योग्य जागेवर पोहोचवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. पण जर तू बॉक्समध्ये पोहोचूच शकला नाहीस, तर गोल कसा करणार?' त्याला ते जमत नव्हतं. चेंडू पायात असो वा नसो, तो अजिबात धावत नव्हता. कारण, त्याने स्वतःला तसं तयारच केलं नव्हतं.'

टेन हॅग मॅनेजर झाल्यावर सुरू झाल्या अडचणी

मँचेस्टर युनायटेडमध्ये परतल्यानंतर पहिल्या हंगामात रोनाल्डो भन्नाट फॉर्ममध्ये होता. २०२१-२२ च्या हंगामात सर्व स्पर्धा मिळून या सुपरस्टारने २४ गोल केले होते. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (Premier League) १८ आणि युईएफए चॅम्पियन्स लीगमध्ये (UEFA Champions League) ६ गोल करत तो संघाचा टॉप स्कोअरर ठरला होता. पण टेन हॅग यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिस्थिती वेगाने बदलली. २०२२-२३ च्या हंगामाच्या मध्यावर संघ सोडण्यापूर्वी सर्व स्पर्धा मिळून १६ सामन्यांत रोनाल्डोला फक्त तीनच गोल करता आले. प्रीमियर लीगमध्ये तर त्याला फक्त चारच सामन्यांत पहिल्या अकरामध्ये संधी मिळाली होती. टॉटनहॅम हॉटस्परविरुद्धच्या (Tottenham Hotspur FC) सामन्यात हा वाद शिगेला पोहोचला. रोनाल्डोने बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरण्यास स्पष्ट नकार दिला. एवढंच नाही तर सामना संपण्याआधीच तो स्टेडियम सोडून निघून गेला. त्यानंतर पियर्स मॉर्गनला दिलेल्या एका स्फोटक मुलाखतीत त्याने क्लब आणि कोचवर अनेक गंभीर आरोप केले. अखेर नोव्हेंबर २०२२ मध्ये मँचेस्टर युनायटेडसोबतचा त्याचा करार संपुष्टात आला.