Pakistan Crisis: सबसिडीवर मिळणारा गहू आणि पिठाच्या दरावरून सिंध प्रांतातील अन्न वितरण व्यवस्थेत मोठा गोंधळ समोर आला आहे. पुरेसा गहू न मिळणे आणि प्रशासकीय हलगर्जीपणाच्या विरोधात हैदराबादमधील पिठाच्या गिरणी मालकांनी संप पुकारला आहे.

सबसिडीवर मिळणारा गहू आणि सरकारने निश्चित केलेल्या पिठाच्या दरावरून सिंध प्रांतातील अन्न वितरण व्यवस्थेत मोठे दोष समोर आले आहेत. हैदराबादमधील पिठाच्या गिरणी मालकांनी शहरभर संप पुकारला आहे. अपुरा गहू पुरवठा, प्रशासकीय त्रास आणि दरांची योग्य अंमलबजावणी न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे, असे 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने म्हटले आहे.

'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, अट्टा चक्की ओनर्स सोशल वेलफेअर असोसिएशनने जिल्हा प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर संपूर्ण हैदराबादमधील सर्व पिठाच्या गिरण्या बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

सरकारच्या 'अन्यायकारक' धोरणांचा निषेध म्हणून या संघटनेने आधी अंशतः संपाचीही हाक दिली होती. सिंधच्या अन्न विभागाने साध्या रोलर-मिल पिठाचा किरकोळ दर १४५ रुपये प्रति किलो आणि एक्स-मिल दर १३८ रुपये निश्चित केला आहे. हे दर ३१ जानेवारी २०२७ पर्यंत संपूर्ण प्रांतात लागू राहतील. पण या सुधारित दरांमुळे ग्राहकांना फारसा दिलासा मिळालेला नाही.

हैदराबादमधील रोलर फ्लोअर मिल्सना ५,००० युनिट्सहून अधिक सरकारी गव्हाचा कोटा मिळूनही ते सबसिडीवर मिळणारे 'अडीच नंबर' पीठ १७५ रुपये प्रति किलोने विकत असल्याचा आरोप आहे. सरकारी दराने पीठ विकण्याची कोणतीही नोटीस कोणत्याही गिरणीने लावली नव्हती, आणि अधिकाऱ्यांनी या नियमभंगावर कोणतीही कठोर कारवाई केली नाही. दुसरीकडे, खुल्या बाजारात १०० किलो गव्हाच्या पोत्याची किंमत २०० रुपयांनी कमी होऊन १५,४०० रुपये झाली असली तरी, साध्या चक्कीच्या पिठाचा दर अजूनही खूप जास्त आहे, तो प्रति किलो १९० ते २०० रुपयांच्या घरात आहे.

चक्की मालकांनी सबसिडीवर मिळणाऱ्या गव्हाचा कोटा वाढवण्याची मागणी केली आहे. सध्या तो प्रत्येक गिरणीसाठी दिवसाला ६० किलो इतकाच आहे. तसेच त्यांच्या प्रक्रिया खर्चाचा आढावा घेण्याची मागणीही जोर धरत आहे. 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, सरकारने रोलर मिल्सच्या प्रक्रिया खर्चाचा भत्ता प्रति किलो १६ रुपयांवरून वाढवून २६ रुपये केल्यानंतर चक्की मालकांची ही मागणी अधिक तीव्र झाली आहे.

डेप्युटी कमिशनर जैन-उल-अबिदीन मेमन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी वैयक्तिक चक्कींची दैनंदिन दळण क्षमता आणि सरकारी गव्हाचा कोटा यातील तफावत मान्य केली. डेप्युटी कमिशनरांनी जिल्हा अन्न नियंत्रकांना अन्न सचिवांकडे कोटा वाढवण्याची शिफारस करण्याचे निर्देश दिले. मात्र यावर कोणतेही एकमत होऊ शकले नाही, असे 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने सांगितले आहे.