स्पेनच्या पिकोस डी युरोपा नॅशनल पार्कमध्ये एका दुर्मिळ 'कँटाब्रियन' ब्राऊन अस्वलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी एका स्पॅनिश शिकाऱ्याची चौकशी सुरू असून त्याला दोन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
उत्तर स्पेनमध्ये रानडुकरांच्या अधिकृत शिकारीदरम्यान एका दुर्मिळ 'कँटाब्रियन' ब्राऊन अस्वलाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 'पिकोस डी युरोपा नॅशनल पार्क'मध्ये घडली. याप्रकरणी एका स्थानिक शिकाऱ्याला दोन वर्षांपर्यंत जेलची हवा खावी लागू शकते. 'द ऑलिव्ह प्रेस' आणि 'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्पॅनिश अधिकाऱ्यांनी या घटनेची कसून चौकशी सुरू केली आहे. हे तपकिरी अस्वल स्पेनच्या राष्ट्रीय पर्यावरण कायद्यानुसार संरक्षित प्रजातीमध्ये मोडते.
ज्या भागात हे अस्वल मृतावस्थेत आढळले, ते राष्ट्रीय उद्यान स्पॅनिश प्राधिकरणाच्या संरक्षणाखाली येते. 'कॅस्टिला आणि लिओन' या प्रांतीय प्रशासनाने शिकार मोहीम सुरू होण्यापूर्वी या भागाचे सर्वेक्षण केले होते, त्यावेळी तिथे एकही अस्वल आढळून आले नव्हते.
अधिकृत मोहिमेत घडली मोठी चूक
ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हा तिथे मुसळधार पाऊस आणि दाट धुके होते. त्यामुळे शिकारीच्या मोहिमेत अनेक अडचणी येत होत्या. आजूबाजूला काहीही स्पष्ट दिसत नव्हते. याच दरम्यान 'पोसाडा डी वाल्डीओन' या भागात राहणाऱ्या एका स्थानिक शिकाऱ्याने रानडुकराला मारण्यासाठी गोळी झाडली होती.
ही मोहीम अधिकृत अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली सुरू होती. प्रादेशिक पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नॅशनल पार्कचे दोन वॉर्डन जातीने या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. 'ILEON' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे डुकराऐवजी चुकून अस्वलावर गोळी झाडली गेली की ही हत्या जाणीवपूर्वक करण्यात आली, याचा तपास आता अधिकारी करत आहेत.
पुढील न्यायालयीन प्रक्रिया
आता सरकारी वकिलांकडे अधिकृत कायदेशीर कागदपत्रे दाखल झाल्यानंतर, स्पेनचे न्यायालय यावर पुढील निर्णय घेईल. 'SEPRONA' या संस्थेने दिलेला फॉरेन्सिक अहवाल यात महत्त्वाची भूमिका बजावेल. गोळीबाराच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पर्यावरण अधिकारी आणि नॅशनल पार्कचे वॉर्डन यांचे जबाब आणि वन्यजीव अधिकाऱ्यांनी गोळा केलेले पुरावे तपासूनच सरकारी वकील पुढील दिशा ठरवतील.














