चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशमधील २७ ठिकाणांची नावं बदलली आहेत. भारताने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि अशा कुरापतींनी सत्य बदलणार नाही, असं ठणकावून सांगितलं आहे.

New Delhi : चीन आपल्या कुरापती थांबवण्याचं नाव घेत नाहीये. त्याने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नावं बदलण्याची आपली जुनी खोड काढली आहे. यावेळी चीनने तब्बल २७ जागा, डोंगर आणि नद्यांची नावं बदलली आहेत. भारताने यावर चीनला कडक शब्दांत सुनावलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

भारताचं सडेतोड उत्तर

भारताने स्पष्ट केलं आहे की अरुणाचल प्रदेश हा नेहमीच भारताचा भाग होता, आहे आणि राहील. नावं बदलल्याने किंवा खोट्या कहाण्या रचल्याने हे सत्य बदलणार नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'भारताच्या हद्दीतील जागांना काल्पनिक नावं देण्याचा चीनचा कोणताही मूर्खपणाचा प्रयत्न भारत पूर्णपणे फेटाळून लावतो.'

ते पुढे म्हणाले, 'खोटे दावे केल्याने आणि बिनबुडाच्या गोष्टी पसरवल्याने अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे सत्य बदलणार नाही. चीनच्या या हरकतींमुळे भारत-चीन संबंध सामान्य करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण होतो.' दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू असताना चीनने असे चुकीचे परिणाम करणारे काम करू नये, असा सल्लाही जयस्वाल यांनी दिला.