चीनचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्वासू जनरल झांग युक्सिया यांच्यावर गंभीर आरोप आहेत. अण्वस्त्रांची माहिती अमेरिकेला दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ते सध्या लष्कराच्या ताब्यात आहेत.

बीजिंग: अण्वस्त्रांच्या माहितीसह महत्त्वाची माहिती अमेरिकेला दिल्याप्रकरणी चीनमधील एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे. चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष आणि पीपल्स लिबरेशन आर्मीमधील सर्वोच्च गणवेशधारी अधिकारी जनरल झांग युक्सिया यांची चौकशी केली जात आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार, त्यांच्यावर गंभीर शिस्तभंगाची आणि कायद्याच्या उल्लंघनाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

काय आहेत आरोप - 

चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष आणि पीपल्स लिबरेशन आर्मीमधील सर्वोच्च गणवेशधारी अधिकारी जनरल झांग युक्सिया यांच्यावर बढतीसाठी लाच घेतल्याचाही आरोप आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, झांग युक्सिया यांच्यावरील कारवाईमागे अधिकाराचा गैरवापर, लष्करी कारकिर्दीतील भ्रष्टाचार आणि शस्त्रखरेदीतील अनियमितता यांसारखी अनेक कारणे आहेत.

ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रमुख विश्वासूंपैकी एक होते. ते सध्या लष्कराच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. आणखी एक वरिष्ठ अधिकारीही ताब्यात असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी वृत्त दिले आहे. दरम्यान, आता या प्रकरणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.