Manali Heavy Snowfall : हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये झालेल्या तुफान बर्फवृष्टीमुळे हजारो पर्यटक अडकले आहेत. आपले सामान घेऊन बर्फातून चालत जाण्याचे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Manali Heavy Snowfall : हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. हे एक प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक अडकले आहेत. मनालीतील सुंदर बर्फवृष्टी पाहण्यासाठी आलेले हजारो पर्यटक या तुफान बर्फवृष्टीमुळे येथे अडकून पडले आहेत. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी सोमवारपर्यंत आल्याने शनिवार, रविवार आणि सोमवार अशा तीन दिवसांच्या सुट्टीत अनेकजण फिरायला आले होते. येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यात वाहने अडकलेली दिसत आहेत. वाहने अडकल्यामुळे अनेक पर्यटकांना गाडीतून उतरून चालत जावे लागले. सुटकेस आणि इतर सामान घेऊन ते बर्फातून चालत जात असल्याचे दृश्यही समोर आले आहे. या दृश्यांमुळे पर्यटकांची सुरक्षा आणि अतिरिक्त पर्यटनामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर चर्चा सुरू झाली आहे.
रस्त्यावर सर्वत्र दाट बर्फ आणि पाणी
एका दिवसापूर्वी aish_tour ने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, रस्त्यातील अडथळे दूर झाल्याची खात्री केल्याशिवाय मनालीला प्रवास करू नका. हा व्हिडिओ २५ तारखेला पहाटे २.३० वाजता चित्रित करण्यात आला आहे. यात लोक आपले सामान घेऊन मोठ्या कष्टाने चालताना दिसत आहेत. रस्त्यावर सर्वत्र दाट बर्फ आणि पाणी आहे. काहीजण घसरून पडतानाही दिसत आहेत. परिस्थिती अत्यंत कठीण आणि धोकादायक असल्याचे यावरून दिसून येते. अनेक लोकांनी व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. त्यापैकी अनेकांनी अतिरिक्त पर्यटन आणि निसर्गाच्या आव्हानांवर भाष्य केले आहे.


