जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने कमाल केली आहे. अंतिम सामन्यात त्यांनी इराणचा ३७-३४ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. या स्पर्धेतलं भारताचं हे तिसरं सुवर्णपदक आहे.
जपानमध्ये २०२६ चे आशियाई खेळ (Asian Games) सुरू आहेत. आज झालेल्या महिला कबड्डीच्या फायनलमध्ये भारतीय संघाने इराणला ३७-३४ अशा फरकाने हरवून सुवर्णपदकावर नाव कोरलं. या स्पर्धेत भारताला मिळालेलं हे तिसरं सुवर्णपदक आहे. याआधी हांगझोऊमध्ये झालेल्या स्पर्धेतही भारतीय संघानेच चॅम्पियनशिप जिंकली होती.
भारताला तिसरं सुवर्णपदक
आजच्या सामन्याचा शेवटचा टप्पा खूपच थरारक होता. इराणचा संघ जिंकण्यासाठी जिवाचं रान करत होता. सामना संपायला फक्त एक मिनिट उरला असताना इराणला गुणांची अत्यंत गरज होती. पण, भारतीय खेळाडूंनी जबरदस्त खेळ दाखवत इराणच्या आयनाजला (Aynaz) टॅकल केलं आणि भारताचा विजय निश्चित केला.
संजू देवीची कमाल
अखेर भारताने ३७-३४ अशा फरकाने विजय मिळवला आणि पदक तालिकेत आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. या संपूर्ण स्पर्धेत संजू देवीने अप्रतिम खेळ केला. फायनलमध्येही तिने इराणचं आव्हान मोडून काढत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
या सुवर्णपदकासह भारताने आतापर्यंत ३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १३ कांस्य अशी एकूण २७ पदके जिंकली आहेत. पदक तालिकेत भारत सध्या १२ व्या स्थानावर आहे. सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला कबड्डी संघात पूजा, राज राणी, सोनाली विष्णू शिंगटे, पुष्पा, भावना देवी, रितू, संजू देवी, रितू नेगी, मनीषा कुमारी, पिंकी रॉय, ज्योती आणि निकिता यांचा समावेश होता.
पुरुष कबड्डी संघही सुवर्ण जिंकणार का?
आज होणाऱ्या पुरुष कबड्डीच्या फायनलमध्येही भारतीय संघाचा सामना इराणशीच होणार आहे. याआधी, पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत सावन बरवालने २:११:३७ तासांत शर्यत पूर्ण करत राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदक जिंकलं. यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये पदक जिंकण्याची भारताची ४० वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.
जोशना चिनप्पा - वेलवन सेंथिलकुमार जोडीला कांस्य
महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स सांघिक प्रकारात आशी चौकसे, तिलोत्तमा सेन आणि विदर्शा विनोद यांनी रौप्यपदक जिंकलं. वैयक्तिक प्रकाराच्या फायनलमध्ये तिलोत्तमाने चौथं तर विदर्शाने पाचवं स्थान मिळवलं. स्क्वॉश मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत जोशना चिनप्पा आणि वेलवन सेंथिलकुमार या जोडीला हाँगकाँगच्या तांग मिंग हांग आणि ली का यी या जोडीकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
अॅथलेटिक्समध्येही भारताची चमकदार कामगिरी
तिरंदाजीच्या पात्रता फेरीत धीरज बोम्मादेवराने ६९८ गुण मिळवत आशियाई आणि राष्ट्रीय विक्रमासह पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात पहिलं स्थान पटकावलं. तसंच, महिलांच्या कंपाऊंड पात्रता फेरीत चिकीथा तनिपार्थीने ७०५ गुणांसह पहिलं स्थान मिळवलं. बॅडमिंटनमध्ये उन्नती हुडाने पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीच्या हिट्समध्ये अनिमेष कुजूरने पहिलं स्थान मिळवत उपांत्य फेरी गाठली. तलवारबाजीमध्ये महिला संघाने इंडोनेशियाचा ४५-२४ असा, तर पुरुष सेबर संघाने फिलिपिन्सचा ४५-२७ असा पराभव केला. मात्र, दोन्ही संघांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचं आव्हान संपुष्टात आलं.
