YouTube Lawsuit अमेरिकेतील एका १५ वर्षांच्या मुलाने यूट्यूबवर व्यसन लावल्याचा आरोप करत केस केली होती. 'इन्फिनिट स्क्रोल' आणि 'ऑटोप्ले' सारख्या फीचर्समुळे मुलांना अॅपचं व्यसन लागतं, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. आता यूट्यूबने कोर्टाबाहेर या प्रकरणात तडजोड केली आहे.
YouTube Lawsuit: वॉशिंग्टन: यूट्यूब अॅपची रचनाच अशी आहे की, ते पाहणाऱ्यांना मानसिक गुलाम बनवते, असा आरोप करत अमेरिकेतील एका १५ वर्षांच्या मुलाने थेट गुगलवरच केस ठोकली होती. आता या प्रकरणात यूट्यूबने कोर्टाबाहेर तडजोड केली आहे. हा वाद आता मिटला असून, मुलांसाठी अधिक सुरक्षित फीचर्स आणि पॅरेंटल कंट्रोल्स (पालकांसाठी नियंत्रण) आणणार असल्याचं गुगलच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. पण, तडजोडीसाठी किती रक्कम दिली, हे मात्र कंपनीने गुलदस्त्यात ठेवलं आहे.

फ्लोरिडाचा रहिवासी असलेल्या या १५ वर्षांच्या मुलाची ओळख कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये 'आरकेसी' (RKC) अशी ठेवण्यात आली आहे. या मुलाने फक्त यूट्यूबच नाही, तर मेट, टिकटॉक आणि स्नॅपचॅटवरही अशीच केस केली आहे. या प्रकरणाची सुनावणी २७ जुलै रोजी लॉस एंजेलिसमध्ये सुरू होणार आहे. पण त्याआधीच यूट्यूबने एक पाऊल मागे घेत तडजोड केली आहे.
या १५ वर्षांच्या मुलाचा युक्तिवाद असा होता की, यूट्यूबसारख्या सोशल मीडिया अॅप्समधील फीचर्स जाणीवपूर्वक व्यसन लावण्यासाठीच तयार केले आहेत. कधीही न संपणारे व्हिडिओ दाखवणारे 'इन्फिनिट स्क्रोल' आणि एक व्हिडिओ संपल्यावर दुसरा आपोआप सुरू करणारे 'ऑटोप्ले' हे फीचर्स मुलांना अॅपकडे जबरदस्तीने खेचतात, असा याचिकेतील मुख्य आरोप आहे. यामुळे मुलांमध्ये तीव्र नैराश्य (डिप्रेशन), झोप न लागणे आणि मानसिक ताण वाढत असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.
मुलाच्या वकिलांनी, जॉन मॉर्गन आणि एमिली जेफकॉट यांनी आरोप केला की, "या सोशल मीडिया कंपन्या मुलांनी जास्तीत जास्त वेळ स्क्रीनवर घालवावा यासाठी गेली अनेक वर्षे योजनाबद्ध पद्धतीने कट रचत आहेत." सुनावणीच्या अगदी आधीच केस मिटवण्याचा यूट्यूबचा निर्णय म्हणजे त्यांनी आपली चूक मान्य केल्यासारखंच आहे, असंही वकील म्हणाले.
विशेष म्हणजे, याच प्रकारच्या एका केसमध्ये मार्च महिन्यात कॅलिफोर्नियाच्या कोर्टाने मेटा आणि यूट्यूबविरोधात निकाल दिला होता. अॅपच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या एका २० वर्षांच्या तरुणीला ६ मिलियन डॉलर (सुमारे ५० कोटी रुपये) नुकसान भरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला होता. त्यानंतर न्यू मेक्सिकोमधील कोर्टाने मुलांच्या सुरक्षेबद्दल ग्राहकांची दिशाभूल केल्याबद्दल मेटाला ३७५ मिलियन डॉलरचा दंड ठोठावला होता.
असाच मोठा फटका बसण्याच्या भीतीनेच यूट्यूबने आता कोर्टाबाहेर तडजोड केल्याचं मानलं जात आहे. सध्या अमेरिकेत वेगवेगळ्या शाळा आणि व्यक्तींनी दाखल केलेल्या अशाच प्रकारच्या ३,००० पेक्षा जास्त केसेस विविध कोर्टांमध्ये प्रलंबित आहेत.


