व्हॉट्सअॅप लवकरच मोठा बदल आणत आहे, ज्यामुळे यूझर्स फक्त युजरनेम वापरून एकमेकांना कॉल करू शकतील, फोन नंबर सेव्ह करण्याची गरज राहणार नाही. हे फीचर iOS आणि Android च्या बीटा व्हर्जनमध्ये टेस्टिंगमध्ये आहे. 

WhatsApp लवकरच एक महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे वापरकर्ते आता फोन नंबर सेव्ह न करता फक्त युजरनेम टाइप करून कॉल करू शकतील. यामुळे अॅपवरून कॉलची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. कंपनी सध्या हे फीचर Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर टेस्ट करत आहे. एकदा हे अधिकृतपणे सुरू झाले की, युजरनेम वापरून लोकांना मेसेज, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करणे शक्य होणार आहे.

कसे काम करेल नवीन Username Calling फीचर?

फीचर ट्रॅकर WABetaInfo च्या माहितीनुसार, WhatsApp च्या नवीन बीटा व्हर्जनमध्ये असा कोड आढळला आहे ज्यातून हे फीचर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वापरकर्ता कॉल टॅबमध्ये जाऊन सर्च बारमध्ये एखाद्याचे युजरनेम टाइप करेल आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा प्रोफाइल दिसेल. तिथून थेट व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल करता येईल. यामुळे ज्यांचा नंबर सेव्ह नाही, पण युजरनेम माहित आहे अशांशी संपर्क करणे अत्यंत सोपे होणार आहे. मात्र हे फीचर अद्याप चाचणी टप्प्यात आहे आणि अजून सर्वांसाठी उपलब्ध झालेले नाही.

स्पॅम कॉलपासून बचावासाठी नवीन सुरक्षा फीचर

युजरनेमद्वारे कॉल करता येणार असल्यामुळे स्पॅम कॉलची शक्यता वाढू शकते. त्यामुळे व्हॉट्सअॅप 'युजरनेम की' नावाचे अतिरिक्त सुरक्षा फीचर आणणार आहे. कॉल करण्यापूर्वी कॉलरला एक विशिष्ट की एंटर करावी लागेल, त्यानंतरच कॉल कनेक्ट होईल. यामुळे अनोळखी किंवा स्पॅम वापरकर्त्यांना थेट कॉल करण्यापासून रोखणे शक्य होईल. सिग्नलसारख्या काही सुरक्षित मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर असे फीचर आधीच आहे, मात्र WhatsApp हे अधिक सक्षम आणि सुरक्षित पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.

WhatsAppची आणखी नवीन फिचर्सची तयारी

WhatsApp यापूर्वीही सतत नवीन फीचर्स आणत आला आहे आणि आता आणखी काही बदल येणार आहेत. सध्या कंपनी कव्हर फोटो पर्याय, इन-चॅट स्टोरेज मॅनेजमेंट, मीडिया–स्टिकर्ससाठी नवीन फिल्टर्स, नवीन चॅटसाठी मेसेज लिमिट आणि चॅनेल्ससाठी क्विझ फीचर अशा अनेक अपडेट्सवर काम करत आहे. ही फीचर्स सध्या बीटा टेस्टिंगमध्ये आहेत आणि अधिकृत लॉन्चबाबत WhatsApp ने अद्याप तारीख जाहीर केलेली नाही.