जेवणानंतर लगेच चालल्याने शरीर थेट चरबी जाळत नाही, पण यामुळे आपण खाल्लेलं अन्न शरीर कसं वापरतं यात बदल होतो. यामुळे अप्रत्यक्षपणे वजन आणि चरबी कमी होण्यास मदत मिळते.

जेवणानंतर लगेच चालल्याने शरीरातील चरबी झटपट कमी होते, असा आपल्यापैकी अनेकांचा समज असतो. पण खरंतर, जेवणानंतर चालल्याने शरीर थेट चरबी जाळायला सुरुवात करत नाही. तर, आपण जे अन्न खाल्लं आहे, ते शरीर कसं वापरात आणतं, या प्रक्रियेत बदल होतो. याचाच फायदा आपल्याला अप्रत्यक्षपणे वजन आणि चरबी कमी करण्यासाठी होतो. चला तर मग, जेवणानंतर चालण्याचे मुख्य फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.

इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते

जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ खातो, तेव्हा आपल्या रक्तातील ग्लुकोजची (साखरेची) पातळी आणि इन्सुलिन वाढतं. रक्तातील इन्सुलिनची पातळी जास्त झाल्यास, शरीर ऊर्जेला चरबीच्या रूपात साठवू लागतं. पण जेवणानंतर चालल्यामुळे, आपले स्नायू इन्सुलिनच्या मदतीशिवाय थेट रक्तातील ग्लुकोजचा ऊर्जेसाठी वापर करतात. यामुळे इन्सुलिनची पातळी अचानक वाढण्याला आळा बसतो आणि नंतर चरबी जाळण्यासाठी शरीराला मदत मिळते.

चयापचय आणि कॅलरी बर्निंग

जेवणानंतर थोडं चालल्यामुळे पचनक्रियेसाठी लागणारी ऊर्जा वाढते. चालण्यामुळे खूप जास्त कॅलरीज बर्न होत नसल्या तरी, एका जागी बसून राहण्यापेक्षा नक्कीच जास्त कॅलरीज जळतात.

पचनक्रिया सुधारते आणि ताजेतवाने वाटते

जेवणानंतर चालल्यामुळे पोट फुगणे, ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि आळस यांसारख्या समस्या टाळता येतात आणि पचनक्रिया सुधारते.

या गोष्टी लक्षात ठेवा

  1. जेवणानंतर १५ ते ३० मिनिटांच्या आत चालायला सुरुवात करावी. कारण याच काळात रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते.

2. १० ते १५ मिनिटं हलकं चालणं पुरेसं आहे.

3. हळू किंवा मध्यम गतीने चाला. धावपळ करू नका.

4. जेवणानंतर लगेचच जास्त मेहनतीचे व्यायाम करू नका. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.