भारतीय बाजारात दबदबा असलेल्या टोयोटा फॉर्च्युनरचं नवं मॉडेल २०२७ मध्ये लाँच होणार आहे. या नव्या एसयूव्हीचा भन्नाट लूक, ॲडव्हान्स्ड फीचर्स आणि हायब्रिड इंजिनबद्दलच्या १० महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई : भारतात एसयूव्ही (SUV) सेगमेंटमध्ये टोयोटा फॉर्च्युनरची (Toyota Fortuner) वेगळीच क्रेझ आहे. आता या गाडीचं नेक्स्ट जनरेशन मॉडेल लवकरच बाजारात धडकणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर या वर्षाच्या अखेरीस इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट आणि नव्या जनरेशनची फॉर्च्युनर आणण्याच्या तयारीत आहे. टोयोटा साऊथ आफ्रिकेने दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबर २०२६ रोजी नवी फॉर्च्युनर जागतिक पातळीवर लाँच होईल. त्यानंतर २०२७ मध्ये ती भारतात येईल. नव्या हायलक्स पिकअपवरून डिझाईन आणि फीचर्स घेतलेल्या या नव्या फॉर्च्युनरबद्दलच्या १० महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
नवी फॉर्च्युनर भारतात कधी येणार?
नव्या जनरेशनची फॉर्च्युनर २०२७ मध्ये भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल, असा अंदाज आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. पण १ डिसेंबर २०२६ ला तिचं ग्लोबल लाँचिंग होणार असल्याचं फिक्स आहे.
किंमत किती असेल?
सध्याच्या फॉर्च्युनरची एक्स-शोरूम किंमत ३५.११ लाख ते ५०.९७ लाख रुपयांच्या घरात आहे. नव्या मॉडेलची किंमत थोडी जास्त असू शकते. बेस व्हेरियंटची किंमत साधारण ४० लाख रुपये, तर टॉप मॉडेलची किंमत ५५ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. (ही अंदाजित किंमत आहे).
डिझाईनमध्ये काय बदल दिसतील?
नव्या फॉर्च्युनरचा लूक नव्या हायलक्स पिकअपसारखाच दमदार असेल. गाडीचा रुबाबदारपणा कायम ठेवत तिला अधिक शार्प डिझाईन दिलं जाईल. यात रुंद फ्रंट ग्रिल, नवे बंपर, स्लिम एलईडी डीआरएल (DRL), स्प्लिट हेडलॅम्प सेटअप, नवे अलॉय व्हील्स आणि मागच्या बाजूला बदललेला टेलगेट पाहायला मिळेल.
इंटिरिअरमध्ये काय नवीन असेल?
गाडीच्या आतमध्ये मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवा डॅशबोर्ड आणि उत्तम कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतील.
इंजिनचे पर्याय कोणते?
सध्याचेच इंजिन पर्याय नव्या गाडीतही कायम राहण्याची शक्यता आहे. यात २०४ पीएस पॉवर आणि ४२०-५०० एनएम टॉर्क देणारं २.८ लिटर डिझेल इंजिन, २०४ पीएस पॉवर आणि ५०० एनएम टॉर्क देणारं २.८ लिटर डिझेल माईल्ड हायब्रिड इंजिन आणि १६६ पीएस पॉवर व २४५ एनएम टॉर्क देणारं २.७ लिटर पेट्रोल इंजिन मिळू शकतं.
४X४ (4X4) सिस्टीम असेल का?
होय, नव्या फॉर्च्युनरमध्येही फोर-व्हील ड्राईव्ह (4X4) सिस्टीम कायम राहील. काही ठराविक व्हेरियंट्समध्ये लो-रेंज ट्रान्सफर केसही मिळेल, ज्यामुळे ऑफ-रोडिंग करणं अधिक सोपं होईल.
लेव्हल २ ADAS मिळणार का?
सुरक्षेसाठी काही व्हेरियंट्समध्ये लेव्हल २ ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) दिली जाऊ शकते. यात अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग आणि लेन डिपार्चर वॉर्निंग यांसारखे भारी फीचर्स मिळतील.
आणखी कोणते नवे फीचर्स असतील?
१२.३ इंचाची टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट्स, सनरूफ, प्रीमियम ऑडिओ सिस्टीम आणि ३६०-डिग्री कॅमेरा हे फीचर्स मिळण्याची दाट शक्यता आहे.
मायलेज किती मिळेल?
नव्या फॉर्च्युनरच्या मायलेजबद्दल कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. पण जर जुनेच इंजिन वापरले, तर मायलेज सध्याच्या मॉडेलइतकेच असू शकते.
बुकिंग कधी सुरू होणार? हायब्रिड इंजिन असेल का?
भारतातील बुकिंगची तारीख टोयोटाने अजून सांगितलेली नाही. २०२७ च्या लाँचिंगच्या आसपास बुकिंग सुरू होईल. नव्या फॉर्च्युनरमध्ये ४८ व्होल्ट माईल्ड हायब्रिड डिझेल सिस्टीम मिळण्याची शक्यता आहे. पण पूर्णपणे हायब्रिड इंजिन भारतात येईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
टीप: नव्या फॉर्च्युनरची किंमत, फीचर्स आणि इंजिनबद्दलची ही माहिती सध्याच्या रिपोर्ट्स आणि अंदाजांवर आधारित आहे. टोयोटाच्या अधिकृत घोषणेनंतरच खरी माहिती समोर येईल.


