ट्रायच्या सूचनेनंतर लाँच झालेले स्वस्त रिचार्ज प्लॅन्स एअरटेल ॲप आणि इतर थर्ड पार्टी ॲप्सवर दिसत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे प्लॅन्स ग्राहकांना उपलब्ध न करून देणे म्हणजे ट्रायच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप होत आहे.
नवी दिल्ली : ट्रायच्या (TRAI) सूचनेनुसार टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांसाठी कमी किमतीचे कॉलिंग प्लॅन्स लाँच केले आहेत. पण हे स्वस्त प्लॅन्स ग्राहकांना मिळतच नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. अनेकजण Phonepe किंवा Gpay सारख्या ॲप्सवरून रिचार्ज करतात. पण या ॲप्सवर एअरटेलचे (Airtel) काही प्लॅन्स गायब आहेत. एवढंच नाही, तर स्वतः एअरटेलच्या अधिकृत ॲपवरही हे स्वस्त प्लॅन्स दिसत नसल्याचं वृत्त समोर आलं आहे.
एअरटेलकडून ग्राहकांची फसवणूक?
जर तुम्ही या स्वस्त प्लॅन्सची रक्कम टाकून सर्च केलं, तरी ते ग्राहकांना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना स्वस्त कॉलिंग प्लॅन्स आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नवीन प्लॅन्स आले खरे, पण एअरटेल ॲप आणि थर्ड पार्टी ॲप्सवर ते कुठेच दिसत नाहीत. ट्रायने स्पष्ट सांगितलं होतं की हे प्लॅन्स ॲप्स आणि अधिकृत वेबसाइटवर सहज दिसायला हवेत. पण तरीही एअरटेलकडून ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचं NBT च्या अहवालात म्हटलं आहे.
ट्रायच्या नियमांचं उल्लंघन?
एअरटेलने १८५, २०३ आणि २०६ रुपयांचे कॉलिंग प्लॅन्स आणले होते. पण हे तिन्ही प्लॅन्स एअरटेलची वेबसाइट, ॲप किंवा इतर थर्ड पार्टी ॲप्सवर दिसत नाहीत. सर्च बॉक्समध्ये रक्कम टाकून शोधल्यावरही ते सापडत नाहीत. त्यामुळे एअरटेलने ट्रायच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे.
एकिकडे ट्रायच्या सूचनेनुसार आलेले प्लॅन्स जिओच्या (Jio) ॲप आणि वेबसाइटवर स्पष्ट दिसतात, पण एअरटेलवर ते न दिसणे हा आता चर्चेचा विषय बनला आहे.
एअरटेलचे स्वस्त प्लॅन्स कसे रिचार्ज करावेत?
- सर्वात आधी एअरटेलच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- तिथे विचारलेल्या रकान्यात तुमचा मोबाइल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला सर्व प्लॅन्स दिसतील.
- वेबसाइटवर दिसणाऱ्या 'TRAI-mandated' सेक्शनवर क्लिक करा. तिथे तुम्हाला सर्व स्वस्त प्लॅन्स दिसतील.
- आता सर्च बारमध्ये १८५, २०३ किंवा २०६ यापैकी एक रक्कम निवडा.
- त्यानंतर युपीआय (UPI), डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करून प्लॅन ॲक्टिव्हेट करा.











