Travel Tips : हॉटेलमध्ये चेकइन करण्यापूर्वी लक्षात ठेवा या 7 टिप्स, रहाल सुरक्षित
Travel Tips : प्रवासासाठी हॉटेल बुक करताना, चेक-इनच्या वेळी अनेक लोकांना वेगवेगळ्या अडचणी येतात. त्यामुळे ट्रिपचा मूड सुरुवातीलाच खराब होऊ शकतो. हे टाळण्यासाठी फक्त काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

चेक-इन आणि चेक-आउट
चेक-इन आणि चेक-आउटच्या वेळेबद्दल नक्की माहिती करून घ्या. अनेक हॉटेल्स लवकर चेक-इन किंवा उशिरा चेक-आउट केल्यास अतिरिक्त शुल्क आकारतात. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन हॉटेल बुक करत असाल तर याकडे लक्ष द्या. त्याप्रमाणे तुमचे नियोजन करा.
सुविधांची खात्री करा
सर्वच हॉटेल रूममध्ये वाय-फाय, एसी, बाल्कनी यांसारख्या सुविधा असतीलच असे नाही. तुम्हाला हव्या असलेल्या सुविधा रूममध्ये आहेत की नाही, हे आधीच तपासा. तसेच कार पार्किंग आहे का हे चेक करा. तुम्ही कारने हॉटेलमध्ये गेलात आणि नंतर समजले की कार पार्किंग नाही तर तुम्हाला मोठ्या असुविधेला सामोरे जावे लागेल.
हॉटेलचे लोकेशन
हॉटेलचे लोकेशनही खूप महत्त्वाचे आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड जवळ आहेत का, हे तपासल्यास तुमची धावपळ वाचू शकते. लोकेशन चेक करताना शहरात हे हॉटेल किती सोईचे आहे हे तपासा. तसेच तुम्हाला जेथे जायचे आहे त्याला हे हॉटेल अनुकूल आहे का हेही तपासा.
फ्री कॅन्सलेशन आणि रिफंड
प्रवासाच्या प्लॅनमध्ये काही बदल झाल्यास, फ्री कॅन्सलेशन आणि रिफंडबद्दलची माहिती आधीच विचारून घ्या. अनेकदा काही लहान हॉटेल कॅन्सलेशन अमाऊंट देत नाहीत, त्याची चौकशी करा. त्यानंतरच बुकींगचा निर्णय घ्या. काही कारणाने तुमचे प्लानिंग बदलले तर तुम्हाला बुकींगची जास्तीत जास्त रक्कम मिळेल याकडेही लक्ष द्या.
सर्व्हिस चार्जेस
अनेक ठिकाणी रिसॉर्ट फी, सर्व्हिस चार्जेस आणि टॅक्स लावला जातो. याबद्दल सुरुवातीलाच स्पष्टपणे विचारून घेणे चांगले राहील. त्यामुळे तुम्हाला नेमकी किती रक्कम द्यायची आहे याची माहिती मिळेल. आयत्या वेळी जास्त रक्कम भरावी लागणार नाही.
अतिरिक्त शुल्क
ब्रेकफास्ट, वाय-फाय, पार्किंग यांसारख्या सुविधा आहेत का, हे आधीच विचारा. नाहीतर चेक-इनच्या वेळी तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागू शकतात. अनेकदा ब्रेकफास्टची माहिती नसल्याने पर्यटक बाहेरच ब्रेकफास्ट करतात. त्यानंतर त्यांना याची माहिती मिळते.
स्वच्छता आणि सुरक्षितता
कोणतेही हॉटेल बुक करण्यापूर्वी त्याचे कस्टमर रिव्ह्यू नक्की तपासा. स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या बाबतीत कधीही तडजोड करू नका. कस्टमरने टाकलेले फोटो किंवा व्हिडिओ बघा. त्यातून तुम्हाला नेमकी परिस्थिती दिसेल. त्यानंतरच निर्णय घ्या.

