एटीएम कीपॅडसाठी कोणता मटेरियल वापरायचा, हा निर्णय टिकाऊपणा, सुरक्षा आणि बाहेरील वातावरणाचा परिणाम यासारख्या गोष्टींवर अवलंबून असतो.
मुंबई : एटीएम आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलं आहे. आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपण सहज पैसे काढू शकतो. पण एटीएम वापरताना आपण कार्ड टाकतो, पिन टाकतो आणि पैसे काढून निघून जातो. या सगळ्यात एका छोट्याशा गोष्टीकडे आपलं कधीच लक्ष जात नाही, ती म्हणजे एटीएमचा कीपॅड. हा कीपॅड धातूचा (मेटल) का असतो, याचा कधी विचार केलाय का?
यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा टिकाऊपणा. एटीएम मशीन दिवसभरात हजारो वेळा वापरली जाते. त्यामुळे सतत बटणं दाबणं, साफसफाई आणि ऊन-पावसाचा सामना करण्यासाठी कीपॅड मजबूत असणं गरजेचं आहे. जर मटेरियल मजबूत असेल, तर बटणं जास्त काळ टिकतात आणि योग्यरित्या काम करतात.
याशिवाय, कीपॅडच्या मटेरियलचा संबंध मशीनच्या एकूण सुरक्षेशीही असतो. एका व्हायरल दाव्यानुसार, जर कीपॅड प्लॅस्टिकचा असेल, तर बोटं दाबल्यानंतरची उष्णता त्यात काही काळ राहू शकते. यामुळे, खास थर्मल कॅमेऱ्याच्या मदतीने कोणीही तुम्ही दाबलेले आकडे ओळखू शकतं आणि तुमचा पिन चोरू शकतं. धातू उष्णता लवकर बाहेर टाकतो, त्यामुळे हा धोका कमी होतो. पण याचा अर्थ असा नाही की मेटल कीपॅडमुळे तुमचं एटीएम १००% सुरक्षित होतं.
थर्मल इमेजिंगद्वारे पिन चोरणं हे कीपॅडचं मटेरियल, तापमान, वेळ आणि वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवर अवलंबून असतं. ग्राहकांचा पिन सुरक्षित ठेवण्यासाठी आजकालच्या आधुनिक एटीएममध्ये इतरही अनेक सुरक्षा उपाययोजना केलेल्या असतात.
तसेच, मजबूत कीपॅडमुळे अपघाताने होणाऱ्या नुकसानीपासूनही संरक्षण मिळतं. एटीएमचा कीपॅड हा सर्वाधिक हाताळला जाणारा भाग आहे. त्यामुळे मजबूत मटेरियल वापरल्यास वारंवार वापरामुळे बटणं तुटण्याचा किंवा खराब होण्याचा धोका कमी होतो.
त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एटीएममध्ये जाल, तेव्हा त्या कीपॅडकडे जरा निरखून बघा. एक साधा दिसणारा डिझाइनचा निर्णय टिकाऊपणा, देखभाल, बाहेरील वातावरणाचा परिणाम आणि सुरक्षा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतो.


