दूरसंचार विभागाने (DoT) १ नोव्हेंबरपासून कॉलर नेम प्रेझेंटेशन (CNAP) सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता अनओळखी नंबरवरून फोन आल्यावर सिमधारकाचे अधिकृत नाव थेट स्क्रीनवर दिसणार आहे.

मुंबई : मोबाईल वापरकर्त्यांसाठी १ नोव्हेंबरपासून एक मोठा बदल होणार आहे. केंद्र सरकारचा हा नवीन नियम कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

काय आहे हा नवीन नियम?

आत्तापर्यंत आपल्या फोनवर अज्ञात नंबरवरून कॉल आला की समोरची व्यक्ती कोण आहे हे लगेच समजायचे नाही. ट्रूकॉलरसारखे ॲप वापरले तरी अनेकदा कॉलरचे नाव अधिकृत आणि खरे असायचेच असे नाही. पण १ नोव्हेंबरपासून हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. आता कोणताही अज्ञात कॉल आल्यास, ते सिम कार्ड ज्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत आहे, तिचे खरे नाव थेट तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) यासंदर्भात सर्व टेलिकॉम कंपन्यांना कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नवीन नियमांनुसार, १ नोव्हेंबरपासून सर्व टेलिकॉम कंपन्या 'कॉलर नेम प्रेझेंटेशन' (CNAP) ही सेवा सुरू करतील. CNAP ही भारतातील कॉलरची ओळख पटवणारी एक अधिकृत प्रणाली आहे. ही यंत्रणा कॉल करणाऱ्याचा नंबर आणि त्याचे Verified नाव मोबाईल स्क्रीनवर दाखवण्यास मदत करेल.

DoT च्या आदेशानुसार, 4G आणि त्याहून प्रगत नेटवर्क वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी ही CNAP सेवा आपोआप सुरू होईल. तर 2G आणि 3G वापरकर्त्यांसाठी ही सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

हे कॉलर आयडी कसे काम करेल?

DoT ने दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या फोनवर कॉल आल्यावर सुरुवातीला कॉल करणाऱ्याचा नंबर स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर टेलिकॉम सर्व्हरवर नोंदणीकृत असलेले त्या व्यक्तीचे अधिकृत नाव स्क्रीनवर फ्लॅश होईल, मग तो नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह असो वा नसो.

यासोबतच CNAP सेवा आंतरराष्ट्रीय कॉल्सची माहिती देण्यासाठीही काम करणार आहे. यासाठी एक स्वतंत्र डेटाबेस तयार करण्याचे निर्देश DoT ने कंपन्यांना दिले आहेत. सध्या याचे प्रयोग सुरू असून लवकरच आंतरराष्ट्रीय कॉल्सबाबतही ही माहिती स्क्रीनवर मिळू लागेल.

सायबर फसवणूक आणि स्पॅम कॉल्सना आळा घालणे हा या CNAP सेवेचा मुख्य उद्देश आहे. कॉलिंगद्वारे होणारे गुन्हे रोखणे आणि नागरिकांना सतर्क ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.