ऑफिस असो वा घर, आजकाल लॅपटॉपशिवाय आपलं पान हलत नाही. पण दिवसभर स्क्रीनकडे बघून मान आणि पाठीत भयंकर वेदना होतात. याकडे साधं दुखणं म्हणून दुर्लक्ष करू नका, कारण डॉक्टर याला 'टेक नेक' (Tech Neck) हा नवा आजार मानतात.
ऑफिस असो वा घर, आजकाल लॅपटॉपशिवाय आपलं पान हलत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत आपले डोळे लॅपटॉपच्या स्क्रीनवर खिळलेले असतात. त्यानंतर मानेत आखडलेपणा, खांद्यांत भयंकर वेदना, पाठीत ताण आणि अनेकदा डोकेदुखी सुरू होते. तुम्हाला वाटत असेल की हे साधं दुखणं आहे, पण डॉक्टर सांगतात की तुमच्या याच सवयीमुळे 'टेक नेक' (Tech Neck) नावाचा नवा आजार बळावतोय.
नेमकी चूक कुठे होतेय?
आपण जेव्हा लॅपटॉप टेबलवर ठेवून काम करतो, तेव्हा स्क्रीन आपल्या डोळ्यांच्या लेव्हलपेक्षा खूप खाली असते. त्यामुळे साहजिकच आपली मान ४५ ते ६० अंश (degrees) खाली झुकते. तुम्हाला माहितीये का, आपल्या डोक्याचं वजन साधारण ५ ते ६ किलो असतं. मान सरळ असेल तर एवढंच वजन मानेवर पडतं. पण मान १५ अंश झुकली की हा दाब १२ किलो होतो, ४५ अंश झुकली की २२ किलो आणि ६० अंश झुकली की मानेच्या हाडांवर आणि स्नायूंवर तब्बल २७ किलोचा दाब पडतो. तासन् तास हा दाब सहन केल्यामुळे स्नायू कडक होतात आणि रक्तप्रवाह मंदावतो.
सुरुवातीला हे फक्त साधं दुखणं वाटतं. पण हळूहळू यातून सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, मानेची चकती सरकणे (स्लिप डिस्क), हातात मुंग्या येणे, बधीरपणा आणि अगदी मणक्याचं कायमस्वरूपी नुकसानही होऊ शकतं.
यावर उपाय काय?
१. स्क्रीनची उंची वाढवा: लॅपटॉप थेट टेबलवर ठेवून कधीच काम करू नका. लॅपटॉप स्टँड वापरा किंवा काही जाड पुस्तकांवर तो ठेवा. स्क्रीनचा वरचा भाग तुमच्या डोळ्यांच्या रेषेत असावा. यासोबतच वेगळा कीबोर्ड आणि माऊस वापरा, जेणेकरून हातांची पोझिशनही योग्य राहील.
२. खुर्ची आणि बसण्याची पद्धत: खुर्चीत पाठ सरळ ठेवून बसा. कमरेच्या मागे एक छोटं कुशन ठेवा. कोपर ९० अंशाच्या कोनात असावेत, खांदे रिलॅक्स ठेवा आणि दोन्ही पाय जमिनीवर सपाट ठेवा. वाकून किंवा एका बाजूला कलून बसू नका.
३. ३०-३० चा नियम पाळा: दर ३० मिनिटांनी ३० सेकंदांचा ब्रेक घ्या. जागेवरून उठा, मान हळूहळू डावी-उजवीकडे आणि वर-खाली फिरवा. खांदे ५ वेळा पुढे आणि मागे गोल फिरवा. डोळे मिटून दोन वेळा दीर्घ श्वास घ्या.
४. झोपण्याच्या सवयी: खूप उंच किंवा कडक उशी वापरू नका. काम संपल्यावर गरम पाण्याचा शेक घेतल्यास किंवा हलके स्ट्रेचिंग केल्यास वेदना कमी व्हायला मदत होते.
लक्षात ठेवा, या दुखण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जर वेदना खांद्यावरून हातापर्यंत पोहोचत असतील, हातात मुंग्या येत असतील किंवा बधीरपणा जाणवत असेल, रात्री वेदना वाढत असतील आणि विश्रांती घेऊनही कमी होत नसतील, तर तातडीने ऑर्थोपेडिक किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या.
