Singer Zubeen Garg died आसामचे लोकप्रिय गायक जुबिन गर्ग यांचे सिंगापूरमध्ये निधन झाले. त्यांच्या जाण्याने ईशान्य भारतात शोककळा पसरली आहे. त्यांची अनेक गाणी ईशान्य भारतातील लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत.

Singer Zubeen Garg died : आसामचे लोकप्रिय गायक, संगीतकार आणि सांस्कृतिक जुबिन गर्ग यांचे सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंगदरम्यान झालेल्या अपघातात निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या या जाण्याने आसामसह संपूर्ण ईशान्य भारतात आणि भारतीय संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुबिन गर्ग सिंगापूरमध्ये आयोजित नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. आज त्यांचा संगीत कार्यक्रम होणार होता. मात्र, ते स्कुबा डायव्हिंगसाठी गेले असताना दुर्दैवी घटना घडली. सिंगापूर पोलिसांनी त्यांना समुद्रातून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु अखेर ते अपयशी ठरले.

आसामी, बांग्ला, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांमध्ये तब्बल ४०,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड करून जुबिन गर्ग हे देशातील सर्वाधिक बहुआयामी आणि लोकप्रिय गायकांपैकी एक ठरले होते.

गायनाबरोबरच त्यांनी अभिनय आणि संगीत दिग्दर्शन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली. आसामी व बांग्ला चित्रपटांत त्यांनी अभिनय केला, अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळींना सक्रिय पाठिंबा दर्शविला.

अलीकडच्या काळात ते विशेषतः आसामी चित्रपटसृष्टीला पुनर्जीवित करण्यासाठी काम करीत होते. मिशन चायना ते सिकार अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांशी नाते जपले आणि स्थानिक चित्रपटसृष्टीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पुढील चित्रपट रॉय रॉय बिनालेचा प्रदर्शनाचा दिवस ३१ ऑक्टोबर निश्चित करण्यात आला होता.

त्यांच्या या बहुआयामी योगदानामुळे जुबिन गर्ग हे केवळ गायक न राहता एक संपूर्ण सांस्कृतिक चळवळ ठरले. त्यामुळे त्यांचे अचानक झालेले निधन केवळ संगीतसृष्टीसाठीच नव्हे तर संपूर्ण ईशान्य भारताच्या सांस्कृतिक वारशासाठीही मोठा धक्का आहे.

जुबिन गर्ग हे केवळ गायक नव्हते तर ते अभिनेता, संगीतकार आणि निर्मातेही होते. आसामी संगीत आणि सिनेमा जगतात त्यांनी विशेष योगदान दिले. हिंदी, आसामी, बांग्ला यांसह विविध भाषांमध्ये त्यांनी आपला आवाज दिला आणि प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या बहुआयामी कलागुणांमुळे ते तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या हृदयात स्थान मिळवू शकले.

त्यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये प्रचंड दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. आसाममधील रस्त्यांवर, सोशल मीडियावर आणि विविध सांस्कृतिक मंचांवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ईशान्य भारतातील सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात जुबिन गर्ग यांनी मोठे योगदान दिले होते. त्यामुळे त्यांचा हा आकस्मिक अंत असह्य ठरत आहे.

भारतीय संगीत क्षेत्रात जुबिन गर्ग यांचे नाव नेहमी आदराने घेतले जाईल. त्यांचा गोड आवाज, अनोखी शैली आणि संगीतावरील प्रेम यामुळे ते सदैव चाहत्यांच्या आठवणीत जिवंत राहतील.