Coriander Tips : कोथिंबीर ताजी असूनही लवकर खराब होत असेल तर या टिप्स करा फॉलो
Coriander Tips : आपण बाजारातून आणलेली कोथिंबीर काही तासांतच खराब होते. पण काही सोप्या टिप्स वापरल्यास कोथिंबीर आठवडाभर ताजी ठेवता येते. चला तर मग पाहूया कसं..

लवकर खराब होते -
आपल्या जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी कोथिंबीर खूप उपयुक्त आहे. यामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. पण कोथिंबीर कितीही चांगली ठेवली तरी ती खराब होते, ही एक मोठी समस्या आहे.
हवाबंद ठिकाणी ठेवू नका -
बाजारातून कोथिंबीर आणल्यावर त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ती नीट धुतली नाही किंवा सुकवली नाही, तर पानांमध्ये राहिलेल्या ओलाव्यामुळे ती लवकर खराब होते. विशेषतः हवाबंद ठिकाणी ठेवू नये.
असे केल्यास खराब होणार नाही -
सर्वात आधी बाजारातून कोथिंबीर आणल्यावर ती लगेच स्वच्छ धुवा. नंतर त्यातील सर्व पाणी काढण्यासाठी ती चांगली सुकवा. असे केल्याने कोथिंबिरीच्या पानांमधील ओलावा कमी होतो आणि ती खराब होत नाही.
हळदीच्या पाण्यात ठेवा -
कोथिंबीर जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी हळदीच्या पाण्याची पद्धत खूप उपयुक्त आहे. एका भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यात थोडी हळद घाला. नंतर कोथिंबीर 20 ते 30 मिनिटे हळदीच्या पाण्यात भिजवून ठेवा. हळदीतील नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे पानांवरील सूक्ष्मजंतू नष्ट होतात. नंतर पाने पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करा. यामुळे कोथिंबीर ताजी राहते.
पाने सडण्याची शक्यता -
अनेकजण कोथिंबीर धुतल्यानंतर लगेच झाकून ठेवतात, ही एक मोठी चूक आहे. कोथिंबीर आणल्यावर थेट डब्यात ठेवू नका. आधी कोथिंबीर चांगली कोरडी करा. टिश्यू पेपर किंवा सुती कापडाने पानांवरील पाणी हळूवारपणे पुसून घ्या. पानांवर पाण्याचा एक थेंबही राहता कामा नये. पाणी राहिल्यास फ्रिजमध्ये ठेवूनही पाने सडण्याची शक्यता असते.
जेवणाची चव वाढेल आणि पैसेही वाचतील -
वरील पद्धती वापरून तुम्ही कोथिंबीर अनेक दिवस ताजी ठेवू शकता. या सोप्या टिप्समुळे तुमच्या जेवणाची चव वाढेल आणि कोथिंबिरीचे फायदेही मिळतील. वारंवार खरेदी करावी लागणार नाही, त्यामुळे तुमचे पैसेही वाचतील.
