Realme C100 4G : रियलमीने आपला नवीन बजेट फोन C100 4G व्हिएतनाममध्ये सादर केला आहे. 8000mAh क्षमतेची मोठी बॅटरी, मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स आणि 50-मेगापिक्सलचा कॅमेरा ही या फोनची मुख्य आकर्षणं आहेत.
रियलमीने आपल्या बजेट स्मार्टफोनच्या सिरीजमध्ये एक नवीन फोन 'रियलमी C100 4G' व्हिएतनामच्या बाजारात लाँच केला आहे. हा फोन अशा ग्राहकांसाठी बनवला आहे ज्यांना जास्त वेळ चालणारी बॅटरी आणि मजबूत बिल्ड क्वालिटी हवी आहे. मोठी स्क्रीन, दमदार बॅटरी आणि चांगला कॅमेरा ही या रियलमी C100 4G स्मार्टफोनची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
रियलमी C100 4G: काय आहेत फीचर्स?
रियलमी C100 4G मध्ये 6.8-इंचाचा मोठा एचडी+ डिस्प्ले दिला आहे. 120Hz रिफ्रेश रेटमुळे हा डिस्प्ले वापरायला एकदम स्मूथ वाटतो. यात 1200 निट्सपर्यंत ब्राइटनेस मिळतो, ज्यामुळे घराबाहेर उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते. स्क्रीनच्या संरक्षणासाठी आर्मरशेल ग्लास प्रोटेक्शनही देण्यात आले आहे. फोनच्या परफॉर्मन्ससाठी यात मीडियाटेक हेलिओ G92 मॅक्स चिपसेट वापरला आहे. फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित रियलमी यूआय 7.0 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी याच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. यात नाईट मोड, पोर्ट्रेट आणि प्रो मोडसारखे अनेक फीचर्स मिळतात. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरच्या बाजूला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची 8000mAh क्षमतेची बॅटरी. 45-वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे ही बॅटरी लवकर चार्ज होते आणि जास्त वेळ टिकते. याशिवाय, फोनला पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP66, IP68, IP69 आणि IP69k सारखी रेटिंग्स मिळाली आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या फोनने मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स टेस्टही यशस्वीपणे पास केली आहे.
फोनची किंमत
व्हिएतनाममध्ये या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत अंदाजे 22,500 रुपये आहे. हा स्मार्टफोन इटर्नल ब्राऊन, ट्रायम्फल पर्पल आणि व्हाइट ग्लोरी या रंगांमध्ये उपलब्ध आहे. कमी बजेटमध्ये जास्त बॅटरी लाईफ आणि मजबूत फोन हवा असणाऱ्या ग्राहकांसाठी रियलमी C100 4G एक चांगला पर्याय ठरू शकतो, असं म्हटलं जात आहे.


