ॲपल 2027 च्या मार्चमध्ये आयफोन 18, आयफोन 18E आणि आयफोन एअर 2 हे तीन नवीन मॉडेल्स लाँच करण्याची शक्यता आहे. या मॉडेल्सच्या डिस्प्ले, बॅटरी आणि कॅमेऱ्यात मोठे बदल अपेक्षित आहेत. जाणून घ्या या फोन्सची संभाव्य किंमत आणि फीचर्स.
मुंबई : ॲपलचे चाहते ज्या नवीन आयफोन मॉडेल्सची आतुरतेने वाट पाहत आहेत, ते 2027 च्या सुरुवातीला बाजारात येऊ शकतात. कंपनी आयफोन 18, आयफोन 18E आणि सेकंड जनरेशन आयफोन एअर 2 असे तीन मॉडेल्स लाँच करणार असल्याची चर्चा आहे. हे लाँचिंग फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान होऊ शकतं, पण मार्च महिन्यात लाँच होण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवली जात आहे.
रिपोर्ट्सनुसार, यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या लाँच इव्हेंटमध्ये ॲपल फक्त प्रो मॉडेल्स आणि त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन 'आयफोन ड्युओ' यावरच लक्ष केंद्रित करणार आहे. याचा अर्थ असा नाही की कंपनी सामान्य आयफोन मॉडेल्स लाँच करणार नाही, तर त्यासाठी एक स्वतंत्र इव्हेंट आयोजित करण्याची कंपनीची योजना असू शकते.
आयफोन 18 - डिस्प्ले आणि बॅटरीमध्ये मोठे बदल?
आयफोन 18 मध्ये 6.3 इंचाचा LTPO OLED डिस्प्ले असू शकतो. यामध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz प्रोमोशन रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता आहे. या नवीन फोनचा डिस्प्ले सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक उजळ आणि कमी बेझल्स असलेला असेल. पण, प्रो मॉडेल्समधील लहान डायनॅमिक आयलंड ऐवजी, सध्याच्या आकाराचं डायनॅमिक आयलंड यामध्ये दिलं जाऊ शकतं. बॅटरीच्या बाबतीतही मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आयफोन 18 मध्ये 4,430mAh ची बॅटरी असू शकते, जी आयफोन 17 मधील 3,692mAh च्या बॅटरीपेक्षा सुमारे 20 टक्क्यांनी मोठी असेल.
या फोनमध्ये TSMC च्या 2 नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित A20 चिप असेल. ही नवीन चिप सध्याच्या A19 चिपपेक्षा जास्त वेगवान आणि 30 टक्क्यांपर्यंत अधिक ऊर्जा कार्यक्षम असेल अशी अपेक्षा आहे. फोनमध्ये 9GB किंवा 12GB रॅम आणि 256GB किंवा 512GB स्टोरेजचे पर्याय मिळू शकतात. मागील बाजूस 48 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे असू शकतात. फ्रंट कॅमेरा 18 मेगापिक्सल किंवा 24 मेगापिक्सलचा असू शकतो. याशिवाय, iOS 27, C2 मोडेम आणि IP68 वॉटर अँड डस्ट रेझिस्टन्स ही फीचर्सही या फोनमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
आयफोन 18E - कमी किमतीत नवीन चिप
आयफोन 18E हा अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होईल आणि यामध्ये प्रामुख्याने परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित केलं जाईल. या फोनमध्येही A20 चिप असण्याची शक्यता आहे. 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले आणि 60Hz रिफ्रेश रेट तसाच राहील. मागील बाजूस 48 मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा असू शकतो. पण, फ्रंट कॅमेरा 24 मेगापिक्सलपर्यंत अपग्रेड केला जाऊ शकतो. यामध्ये 8GB किंवा 9GB रॅम आणि 4,430mAh ची बॅटरी असू शकते. डायनॅमिक आयलंड असेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
आयफोन एअर 2 - नवीन कॅमेरा आणि उत्तम बॅटरी
आयफोन एअर 2 मध्ये दुसरा 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला जाऊ शकतो. बॅटरी लाईफ सुधारण्यासोबतच डायनॅमिक आयलंडचा आकार कमी करण्याचा ॲपलचा प्रयत्न असेल. यामध्ये A20 प्रो चिप असू शकते. 6.5 इंचाचा डिस्प्ले, टायटॅनियम बॉडी, 12GB रॅम आणि 18 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा कायम राहील. हा फोन सध्याच्या मॉडेलपेक्षा 0.4 मिमी पातळ असण्याचीही शक्यता आहे.
भारतात किंमत किती असेल?
रिपोर्ट्सनुसार, भारतात आयफोन 18 ची सुरुवातीची किंमत 99,900 रुपये असू शकते. आयफोन 18E ची किंमत 79,900 रुपये आणि आयफोन एअर 2 ची किंमत 1,49,900 रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, ॲपलने अद्याप नवीन आयफोन मॉडेल्सबद्दल किंवा त्यांचे फीचर्स, किंमत आणि लाँच तारखेबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे, बाहेर आलेल्या माहितीमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.














