RBI ने कर्जवसुलीच्या नियमांमध्ये मोठे बदल करत रिकव्हरी एजंटवर कडक निर्बंध घातले आहेत.
मुंबई : बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) लोन रिकव्हरी (Loan Recovery) प्रक्रियेसंदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ग्राहकांना त्रास, धमकी किंवा मानसिक छळ होऊ नये, यासाठी आरबीआयने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याशिवाय सर्व नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार आहेत.
रिकव्हरी एजंटची दादागिरी चालणार नाही
नव्या नियमांनुसार, रिकव्हरी एजंट ग्राहकांना धमकावू शकणार नाहीत किंवा वारंवार फोन, संदेश करून त्रास देऊ शकणार नाहीत. तसेच सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 वाजल्यानंतर ग्राहकांना रिकव्हरीसाठी फोन करण्यास मनाई करण्यात आली आहे. ग्राहकांच्या कुटुंबीयांना, मित्रांना किंवा ओळखीच्या व्यक्तींना त्रास देण्यासही स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे.
सोशल मीडियावर बदनामी करता येणार नाही
आरबीआयने ग्राहकांच्या प्रायव्हेसीला विशेष महत्त्व दिले आहे. कोणत्याही ग्राहकाचे फोटो, व्हिडिओ किंवा वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करून त्याची बदनामी करता येणार नाही. कर्जवसुलीच्या नावाखाली ग्राहकांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, अशी कोणतीही कृती करण्यास रिकव्हरी एजंटना मनाई असेल.
EMI वरील मोबाईलसाठीही स्पष्ट नियम
ईएमआयवर खरेदी केलेल्या मोबाईलसंदर्भातही आरबीआयने नियम स्पष्ट केले आहेत. ज्या मोबाईलसाठी कर्ज घेतले आहे, तोच मोबाईल विशिष्ट परिस्थितीत लॉक करता येईल. इतर कोणत्याही कर्जाच्या वसुलीसाठी ग्राहकाचा मोबाईल लॉक करता येणार नाही. तसेच मोबाईल लॉक झाल्यानंतरही इनकमिंग कॉल, एसएमएस आणि इतर अत्यावश्यक सुविधा सुरू ठेवणे बंधनकारक असेल.
विलंब झाल्यास ग्राहकाला भरपाई
ग्राहकाने थकबाकी भरल्यानंतर बँक किंवा वित्तीय संस्थेला एक तासाच्या आत मोबाईल पुन्हा अनलॉक करावा लागेल. जर यामध्ये उशीर झाल्यास संबंधित बँक किंवा फायनान्स कंपनीला प्रत्येक तासाच्या विलंबासाठी 250 रुपयांची भरपाई ग्राहकाला द्यावी लागेल.
रिकव्हरी एजंटसाठी नवे नियम
आता प्रत्येक रिकव्हरी एजंटकडे बँकेने जारी केलेले आयडी कार्ड (ID Card) आणि अथॉराइजेशन लेटर (Authorisation Letter) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. ग्राहकाला रिकव्हरी एजंट कधी भेटणार याची माहिती बँकेने आधीच द्यावी लागेल. तसेच रिकव्हरी एजन्सी बदलल्यास त्याची माहितीही ग्राहकाला देणे बंधनकारक असेल.
तक्रार नोंदवणे होणार सोपे
ग्राहकांना रिकव्हरी एजंटच्या वागणुकीबाबत तक्रार करता यावी, यासाठी प्रत्येक बँकेला तक्रार निवारण यंत्रणा उभी करावी लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करून वसुली केल्यास ग्राहकाला योग्य ती भरपाई मिळण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
ग्राहकांना काय फायदा होणार?
या नव्या नियमांमुळे कर्जदारांना अनावश्यक मानसिक त्रास, धमक्या आणि वारंवार येणाऱ्या रिकव्हरी कॉलपासून दिलासा मिळणार आहे. तसेच मोबाईल लोन घेतलेल्या ग्राहकांना थकबाकी भरल्यानंतर फोन अनलॉक करण्यात होणाऱ्या विलंबासाठी भरपाई मिळणार आहे.


