Hyundai ने आपली लोकप्रिय छोटी SUV 'Exter' चं नवीन 'नाइट एडिशन' बाजारात आणलं आहे. पूर्णपणे काळ्या रंगाची थीम असलेली ही कार स्पोर्टी डिझाइन आणि आकर्षक इंटीरियरसह उपलब्ध आहे.
नवी दिल्ली : भारतातील आघाडीची कार कंपनी Hyundai ने आपली लोकप्रिय छोटी SUV 'Exter' चं नवीन 'नाइट एडिशन' (Knight Edition) लाँच केलं आहे. पूर्णपणे ब्लॅक थीममध्ये असलेल्या या नव्या SUV ची सुरुवातीची किंमत 8.13 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 9.60 लाख रुपयांपर्यंत जाते.
नवीन 'एक्सटर नाइट' एडिशनला पूर्णपणे काळ्या रंगाची थीम देऊन डिझाइन केलं आहे, ज्यामुळे या SUV ला पूर्वीपेक्षा जास्त स्पोर्टी आणि दमदार लूक मिळाला आहे. ग्राहकांसाठी हे मॉडेल पेट्रोल मॅन्युअल, पेट्रोल एएमटी (AMT) आणि 'हाय-सीएनजी ड्युओ' (Hy-CNG Duo) अशा एकूण चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.
कंपनीने या नाइट एडिशनमध्ये इंजिन किंवा इतर मेकॅनिकल भागांमध्ये कोणताही मोठा बदल केलेला नाही. त्याऐवजी, मुख्यत्वे गाडीच्या बाहेरील डिझाइन (Exterior Design) आणि इंटीरियरमध्ये आकर्षक बदल करण्यात आले आहेत.
ब्लॅक थीममध्ये एक्सटरचा जबरदस्त लूक
बाहेरून एक्सटर नाइट एडिशनला पूर्णपणे वेगळा आणि खास लूक देण्यासाठी कंपनीने मेहनत घेतली आहे. यामध्ये मॅट ब्लॅक रंगाचे 'Hyundai' आणि 'Exter' लोगो बॅज दिले आहेत. पुढच्या आणि मागच्या बंपरवर डार्क ग्रे गार्निश आहे, तर साइड प्रोफाइललाही डार्क ग्रे टच दिला आहे.
याशिवाय, कारच्या साइडला खास 'Knight' बॅजिंग आणि 15-इंचाचे ब्लॅक अलॉय व्हील्स दिले आहेत. पुढच्या ब्रेक कॅलिपर्सना लाल रंग दिला आहे, जो काळ्या रंगाच्या थीमसोबत खूपच छान दिसतो. काही लोअर व्हेरिएंटमध्ये डार्क ग्रे रंगाचे स्टील व्हील्स मिळतील. सध्या ही कार टायटॅनियम ब्लॅक, ॲटलास व्हाइट, स्टारी नाइट, टायटन ग्रे आणि गोल्डन ब्राँझ या रंगांमध्ये खरेदी करता येईल.
आकर्षक ऑल-ब्लॅक इंटीरियर
SUV च्या केबिनमध्येही पूर्णपणे ब्लॅक थीमच वापरण्यात आली आहे. डॅशबोर्ड आणि केबिनमध्ये अनेक ठिकाणी ब्रास (पितळी) रंगाचा सुंदर टच दिला आहे. यात ब्लॅक सेमी-फॅब्रिक सीट्स, ॲम्बर फूटवेल ॲम्बियंट लायटिंग आणि काही व्हेरिएंटमध्ये ब्लॅक डी-कट स्टीयरिंग व्हील दिलं आहे. फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि अनेक आधुनिक सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत.
इंजिनमध्ये कोणताही बदल नाही
एक्सटर नाइटमध्ये पूर्वीप्रमाणेच 1.2-लीटर कप्पा (Kappa) पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि स्मार्ट एएमटी गिअरबॉक्ससोबत खरेदी करता येईल. यासोबतच, कंपनीने 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असलेलं 1.2-लीटर हाय-सीएनजी ड्युओ इंजिनचा पर्यायही दिला आहे.
Hyundai च्या मते, कंपनीच्या 'नाइट एडिशन' मॉडेल्सना ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 2022 मध्ये हे एडिशन सुरू झाल्यापासून आतापर्यंत Hyundai ने तब्बल 1 लाखांहून अधिक 'नाइट' एडिशन कार विकल्या आहेत. आता या नवीन एक्सटर नाइट एडिशनमुळे, कंपनीने छोट्या SUV सेगमेंटमध्ये ग्राहकांना आणखी एक स्पोर्टी आणि प्रीमियम पर्याय उपलब्ध करून दिला आहे.


