- Home
- Utility News
- Indian Railway Offer : रेल्वेकडून प्रवाशांना सणासुदीचे गिफ्ट! रिटर्न तिकिटावर मिळणार २०% सूट, जाणून घ्या सविस्तर माहिती
Indian Railway Offer : रेल्वेकडून प्रवाशांना सणासुदीचे गिफ्ट! रिटर्न तिकिटावर मिळणार २०% सूट, जाणून घ्या सविस्तर माहिती
Indian Railway Offer : भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात 'राउंड ट्रिप पॅकेज स्कीम' सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, येण्या-जाण्याचा प्रवास एकत्र बुक केल्यास, परतीच्या तिकिटावर २०% सूट मिळेल. ही योजना १४ ऑगस्टपासून बुकिंगसाठी खुली करण्यात आली.

मुंबई : सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. भारतीय रेल्वेने प्रवास सुलभ आणि परवडणारा करण्याच्या उद्देशाने एक नवी योजना सुरू केली आहे. "राउंड ट्रिप पॅकेज स्कीम". या योजनेंतर्गत, येण्या-जाण्याचा प्रवास एकत्र बुक केल्यास, परतीच्या तिकिटावर थेट २० टक्के सूट मिळणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये, नेमकी ऑफर काय आहे?
भारतीय रेल्वेने ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. यामध्ये, फेस्टिव्हल स्पेशल गाड्या आणि नियमित मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा मिळणार आहे. मात्र, ही सुविधा प्रीमियम गाड्यांसाठी (जसे की राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस वगैरे) लागू नाही.
सवलतीचा कालावधी आणि बुकिंगची सुरुवात
ही योजना १४ ऑगस्टपासून बुकिंगसाठी खुली करण्यात आली आहे.
जाण्याचा प्रवास: १३ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर २०२५
परतीचा प्रवास: १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५
या कालावधीत दोन्ही बाजूचे तिकिट एकत्र बुक केल्यासच २०% सूट लागू होईल.
अटी व नियम, सूट मिळवण्यासाठी काय करावं लागेल?
जाणे व परतणे दोन्ही तिकिटे एकाच वेळी बुक करणे बंधनकारक आहे.
दोन्ही बाजूंचा प्रवास एकाच ट्रेननेच असावा.
उदा. जर तुम्ही विदर्भ एक्सप्रेसने जात असाल, तर परतीसाठीही तीच ट्रेन बुक करावी लागेल.
प्रवाशाचे नाव, वय, बोर्डिंग स्टेशन, डेस्टिनेशन, तसेच कोच क्लास (स्लीपर, 3AC, 2AC) हे सर्व तपशील दोन्ही तिकिटांवर अगदी सारखे असणे आवश्यक आहे.
फक्त एकाच बाजूचे तिकीट घेतल्यास ही सवलत मिळणार नाही.
ही योजना कोणासाठी फायदेशीर ठरेल?
ही योजना विशेषतः सणासुदीच्या काळात आपल्या गावी जाण्याचा आणि काही दिवसांनी परत येण्याचा विचार करणाऱ्या प्रवाशांसाठी खूप फायदेशीर ठरेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या प्रवाशाने मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी आणि परतीचे तिकीटही एकाच वेळी बुक केले, तर परतीच्या प्रवासावर थेट २०% सूट मिळेल. यामुळे एकूण खर्चात लक्षणीय बचत होईल.
योजनेचे फायदे, का घ्यावा या ऑफरचा लाभ?
प्रवाशांचा प्रवास खर्च कमी होईल
तिकीट बुकिंग वेळेत आणि सुबक होईल
शेवटच्या क्षणी परतीचे तिकीट मिळवण्याची धावपळ टळेल
एकत्र बुकिंग केल्यामुळे प्रवासाची खात्री मिळेल
''राउंड ट्रिप पॅकेज स्कीम'' ही भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी आणलेली एक उपयुक्त आणि खर्च वाचवणारी योजना आहे. दीर्घ पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा, कारण यात वेळ, पैसा आणि प्रवासाच्या सुलभतेचा त्रिसूत्री लाभ मिळतो.

