New Study on AI : आपण अनेकदा मुलांना सर्वांशी आदराने बोलण्याचा सल्ला देतो. केवळ माणसांशीच नाही, तर अलेक्सा, सिरी यांसारख्या AI असिस्टंटशी बोलतानाही आपण सभ्य भाषेचा वापर करतो.

पेन्सिल्व्हेनिया : आपण अनेकदा मुलांना सर्वांशी आदराने बोलण्याचा सल्ला देतो. केवळ माणसांशीच नाही, तर अलेक्सा, सिरी यांसारख्या AI असिस्टंटशी बोलतानाही आपण सभ्य भाषेचा वापर करतो. तंत्रज्ञानाच्या जगातही तुम्ही चॅटबॉटशी जितके सभ्यपणे बोलाल, तितके चांगले परिणाम मिळतील, असा अनेकांचा समज आहे. पण आता, कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (AI) एका नवीन संशोधनाने हा विचार पूर्णपणे बदलून टाकला आहे. AI चॅटबॉटकडून अचूक उत्तरे हवी असल्यास, सभ्य भाषेत प्रश्न विचारण्याऐवजी अपमानास्पद भाषेत प्रश्न विचारावेत, असे पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातील संशोधकांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात म्हटले आहे.

आश्चर्यकारक संशोधनाचा डेटा?

ChatGPT च्या 4 O मॉडेलचा वापर करून केलेल्या या अभ्यासासाठी, संशोधकांनी वेगवेगळ्या विषयांवरील 50 मूळ प्रश्न निवडले. प्रत्येक प्रश्न पाच वेगवेगळ्या शैलींमध्ये पुन्हा तयार करण्यात आला. यामध्ये अत्यंत सभ्य ते अत्यंत उद्धट प्रश्नांचा समावेश होता. एक अत्यंत उद्धट प्रश्न असा होता, "अरे, तुला हे सुद्धा माहीत नाही का? हे सोडव." तर, "कृपया या समस्येवर विचार करून उत्तर द्या." हा एक सभ्य प्रश्न होता.

संशोधकांच्या मते, याचे परिणाम आश्चर्यकारक होते. संशोधन अहवालानुसार, अत्यंत सभ्य प्रश्नांची अचूकता सुमारे 80.8 टक्के होती. तर, अत्यंत उद्धट प्रश्नांची अचूकता 84.8 टक्क्यांपर्यंत वाढली. सर्वात सभ्य भाषेतील प्रश्नांसाठी, अचूकता केवळ 75.8 टक्के होती.

हे परिणाम पूर्वीच्या संशोधनापेक्षा वेगळे?

मात्र, हे संशोधन पूर्वीच्या संशोधनांच्या विरुद्ध आहे. 2024 मध्ये जपानमधील राइकेन (RIKEN) आणि वासेडा (Waseda) विद्यापीठांनी केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले होते की, उद्धट प्रश्नांमुळे AI ची कामगिरी कमजोर होते. तर, गुगल डीपमाइंडने (Google DeepMind) केलेल्या संशोधनात असे दिसून आले होते की, आश्वासक आणि सकारात्मक भाषा AI ची कामगिरी सुधारते. विशेषतः गणितासारख्या विषयांमध्ये अशी भाषा खूप प्रभावी ठरते, असेही गुगल डीपमाइंडने म्हटले होते.

पेन्सिल्व्हेनियातील संशोधक काय म्हणतात?

पेन्सिल्व्हेनियातील संशोधकांचे म्हणणे आहे की, प्रश्नाच्या शब्दरचनेतील थोडासा बदलही AI च्या उत्तरांच्या गुणवत्तेत मोठा फरक घडवू शकतो. यामुळे AI च्या विश्वासार्हतेवर आणि अंदाज क्षमतेवर प्रश्न निर्माण होतात. तरीही, AI चा गैरवापर करण्याचा सल्ला आम्ही देत नाही, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. अपमानास्पद भाषेचा वापर केल्याने समाजातील आपल्या संवाद साधण्याच्या पद्धतीवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि याचा वापरकर्त्याच्या अनुभवावर व भविष्यातील तंत्रज्ञानावर नकारात्मक परिणाम होईल, असे पेन्सिल्व्हेनियातील संशोधकांचे मत आहे. मशीन कमांडनुसार काम करू शकतात, पण आपण आपली मानवी प्रतिष्ठा विसरू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.