WhatsApp Rules : सोशल मीडिया ॲप्स वापरण्याच्या नियमांमध्ये आजपासून एक मोठा बदल झाला आहे. आता व्हॉट्सॲपसारखे ॲप्स वापरण्यासाठी, तुम्ही ज्या नंबरने अकाऊंट उघडलं आहे, ते सिम कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये सक्रिय असणं गरजेचं आहे. 

नवी दिल्ली: सोशल मीडिया ॲप्स वापरण्याच्या नियमांमध्ये आजपासून एक मोठा बदल झाला आहे. आता व्हॉट्सॲपसारखे ॲप्स वापरण्यासाठी, तुम्ही ज्या नंबरने अकाऊंट उघडलं आहे, ते सिम कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये सक्रिय असणं गरजेचं आहे. याशिवाय, जर तुम्ही कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम वापरत असाल, तर ते ६ तासांनंतर आपोआप लॉगआऊट होईल.

सायबर फसवणूक रोखण्यासाठी नवा नियम

ऑनलाइन फसवणुकीला (सायबर फ्रॉड) आळा घालण्यासाठी आणि वापरकर्त्यांना सहज ट्रॅक करता यावं, यासाठी सरकारने 'टेलिकॉम सायबर सिक्युरिटी नियम 2024' आणले आहेत. भारताच्या दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जिओचॅट, अराट्टाई आणि जोश या ॲप्सना हे नियम लागू करण्यासाठी ९० दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत २८ नोव्हेंबरला संपली असून, १ मार्चपासून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यानंतर एका महिन्याच्या आत सर्व ॲप्सना त्यांनी नियमांचे पालन केल्याचा अहवाल सरकारला सादर करावा लागेल.

काय बदल होणार?

आतापर्यंत मोबाईलमध्ये सिम कार्ड नसतानाही, फक्त तो नंबर आणि त्यावर आलेला ओटीपी टाकून व्हॉट्सॲप सुरू करता येत होतं. पण आता तसं करता येणार नाही. नोंदणी केलेला नंबर असलेलं सिम कार्ड मोबाईलमध्ये असेल, तरच तुम्हाला ते ॲप वापरता येईल.

यासोबतच, अनेक जण कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वेब किंवा टेलिग्राम वेब लॉग-इन करतात आणि नंतर लॉगआऊट करायला विसरतात. यामुळे त्यांच्या खात्याचा गैरवापर होण्याचा धोका असतो. म्हणूनच, आता ६ तास वापर न झाल्यास ही वेब खाती आपोआप लॉगआऊट होतील.