पावसाळ्यात मोबाईल फोनची सुरक्षा करण्यासाठी या सोप्या टिप्स अवलंबा. पाऊस पडत असताना मोबाईलला पाण्यापासून कसे वाचवायचे, भिजल्यावर काय करायचे आणि कोणत्या उपायांनी फोन सुरक्षित ठेवता येईल ते जाणून घ्या. मोबाईलच्या काळजीसाठी संपूर्ण मार्गदर्शक वाचा.

भारतातील अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. हा पाऊस केवळ उन्हापासून दिलासा देत नाही तर अनेक समस्याही निर्माण करतो. प्रत्येकजण कुठेही जाताना फोन सोबत नेतो. अशावेळी जर मोबाईल पाण्यात भिजला तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तुम्हीही फोन खराब होण्यापासून वाचवू इच्छित असाल तर पावसाळ्यात मोबाईल फोनची काळजी घेण्यासाठीच्या काही सोप्या टिप्स जाणून घ्या.

मोबाईलला पावसापासून कसे वाचवायचे?

१) ऑफिसला जाणारे किंवा नेहमी बाहेर जाणारे लोकं नेहमीच वॉटरप्रूफ पाउच किंवा केस सोबत ठेवावे. हे फोनला पावसापासून वाचवण्यासोबतच फोन सुरक्षित ठेवते. तुम्ही जेव्हा हे खरेदी कराल तेव्हा मागे लिहिलेली माहिती वाचा. त्यावर वेदर सील आणि आयपी रेटिंग असणे आवश्यक आहे. जर एखाद्या परिस्थितीत केस नसेल तर तुम्ही तात्पुरता उपाय म्हणून झिपलॉक वापरू शकता.

२) जर पाऊस पडत असेल तर फोन सोबत नेऊ नका. मोबाईल कोरड्या, सुरक्षित ठिकाणी ठेवा. तो बाहेरील खिशात आणि उघड्या बॅगेत ठेवण्याचे टाळा. जर हात ओले असतील तर फोनला हात लावू नका.

३) अनेक लोक फोन ओला झाल्यावर तो थेट चार्जिंगला लावतात. हे खूप धोकादायक ठरू शकते. जर फोनमध्ये ओलावा असेल तर तो चार्जिंग पोर्टपासून पूर्णपणे दूर ठेवा. हे शॉर्ट सर्किटचे कारणही बनू शकते.

४) पावसात फोन कॉल्स उचलण्यासाठी ब्लूटूथ किंवा इयरबड्सचा वापर करू शकता. हे फोनला कनेक्ट करते. त्यामुळे फोन वारंवार बाहेर काढावा लागणार नाही.

५) पावसात फोन ओला झाला असेल तर ओलावा काढून टाकण्यासाठी हलक्या, कोरड्या आणि लिंट-फ्री कपड्याने फोन पुसून टाका. विशेषतः पोर्ट्स आणि स्पीकर ग्रील स्वच्छ करा.

फोनमध्ये पाणी गेल्यास काय करावे?

जर पावसात फोन भिजला असेल तर तो लगेच बंद करा आणि कव्हर किंवा केस लावले असेल तर ते लगेच काढून टाका. नंतर तो कोरड्या कपड्याने हळूवारपणे पुसून टाका. अनेक लोक फोन सुकवण्यासाठी हेअर ड्रायर किंवा उन्हाचा वापर करतात. यामुळे फोन खराब होऊ शकतो. हे करण्याऐवजी तुम्ही फोन सिलिका जेल पॅकेट्समध्ये ठेवू शकता. हे ओलावा शोषून घेते. त्यानंतरही फोन सुरू होत नसेल तर कस्टमर केअर किंवा कंपनी सेंटरशी संपर्क साधा.