Mobile Recharge Price Hike : मोबाईल युजर्सच्या खिशाला आणखी कात्री लागू शकते. टेलिकॉम कंपन्या येत्या काही महिन्यात मोबाईल रिचार्जच्या किमतीत वाढ करणार असल्याची माहिती मिळते आहे. 

मुंबई : मोबाईल रिचार्जच्या वाढत्या दरांमुळे देशभरातील लाखो मोबाईल ग्राहकांकडून संताप व्यक्त होतो. असं असतानाच आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुढील काही काळात युजर्सच्या खिशावरील ताण अधिकच वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. टेलिकॉम कंपन्यांकडून मोबाईल युजर्स फटाका बसू शकतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ब्रोकरेज फर्म सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चकडून एक रिपोर्ट देण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार पुढील ३ ते ४ महिन्यात मोबाईल रिचार्जच्या किमती तब्बल १२ ते १५ टक्कयांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बाजारात सध्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच टेलिकॉम कंपन्या आहेत. त्यामुळेच मोबाईल रिचार्जचे दर वाढवणं, रिचार्ज महाग करणं हे टेलिकॉम कंपन्यांसाठी सोपं झालं आहे, असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

टेलिकॉम सेक्टरबाबत 'सेंट्रम' फर्मकडून आलेल्या अहवालानंतर मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता आहे. भारतीय मोबाईल बाजारात आता जिओ, एअरटेल, व्हीआय आणि बीएसएनएल या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्याच्या बाजारातील एकत्रीकरणानंतर त्यांनी आपली कमाई वाढवण्याबाबतची परिस्थिती चांगल्याप्रकारे सुधारली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत टेलिकॉम कंपन्या त्यांच्या टॅरिफ प्लॅन अर्थात मोबाईल रिचार्जचे दर १२ ते १५ टक्क्यांनी वाढवण्याची योजना आखत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ताण पडून त्यांच्या महिन्याच्या खर्चात वाढ होऊ शकते.

अधिक डेटा वापरामुळे किमतीवर परिणाम

देशभरात मागील काही वर्षात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 4G-5G अगदी खेड्यापाड्यात पोहोचल्यामुळे ग्राहकांकडून इंटरनेट डेटाचा वापर वाढतो आहे. त्यामुळे मोबाईल रिचार्जच्या किमती वाढवण्यावर भर दिला जात आहे.

दुसरीकडे, शेअर मार्केटमध्येही लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. 'सेंट्रम रिसर्च'च्या माहितीनुसार, जिओ आणि एअरटेल आपल्या ग्राहकांच्या संख्येत वाढ करत आहेत. त्यांनी देशातील ९० टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत इंटरनेट सेवा पोहोचत असल्याने ग्राहकांच्या संख्येत वाढ होऊन त्याच्या किमतीही वाढत आहेत.