- Home
- Utility News
- Railway Update : 50 वर्षांची प्रतीक्षा संपणार? मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पाला मोठी गती; 15 डिसेंबरला भूसंपादन मोजणी
Railway Update : 50 वर्षांची प्रतीक्षा संपणार? मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पाला मोठी गती; 15 डिसेंबरला भूसंपादन मोजणी
Manmad Indore Railway Line Project : गेली पाच दशके चर्चेत असलेला मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग प्रकल्प आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. १५ डिसेंबर रोजी मनमाडमध्ये भूसंपादन मोजणी होणार असून, यामुळे औद्योगिक, कृषी आणि धार्मिक क्षेत्राला गती मिळणार आहे.

मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पाला मोठी गती
Railway Update : मनमाड–इंदूर या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाबाबत गेली पाच दशके सुरू असलेली चर्चा अखेर वास्तवात उतरताना दिसत आहे. औद्योगिक, कृषी आणि धार्मिक क्षेत्रांना वेग मिळवून देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
15 डिसेंबरला भूसंपादन मोजणी
उपअधीक्षक भूमी अभिलेख, नांदगाव यांनी मनमाड शहरातील सुमारे 650 मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या असून 15 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मोजणी करण्यात येणार आहे. या नोटिसांमुळे प्रकल्पाला नव्याने गती मिळणार आहे आणि अनेक वर्षे रखडलेली प्रक्रिया पुन्हा मार्गावर आली आहे.
रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा रेल्वेमार्ग
मनमाड-नरडाणा-इंदूर मार्ग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील व्यापार, औद्योगिक वाहतूक, कृषीउत्पादनांची देवाणघेवाण आणि धार्मिक पर्यटनाला मोठा हातभार लावणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक निधी तर निश्चित झाला आहेच, शिवाय दोन्ही राज्यांदरम्यान सामंजस्य करार (MoU) सुद्धा पूर्ण झाला आहे.
शहरातील अनेक मालमत्तांवर संपादनाची टांगती तलवार
या मोजणीमध्ये सामान्य नागरिकांच्या जागांसह
मनमाड नगर परिषद
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI)
सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या जमिनी
यांचाही समावेश आहे.
शहरातील सर्वे नंबर 32, 43, 44, 45, 70, 71, 80, 81, 84, 85, 86 अशा अनेक भागांतील जमीन संपादित केली जाणार आहे.
संपूर्ण प्रक्रिया मध्य रेल्वे, भुसावळ विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनीअर कन्स्ट्रक्शन यांच्या देखरेखीखाली होणार आहे.
मोबदल्याबाबत संभ्रम कायम
नागरिकांमध्ये एकीकडे नाराजी असली तरी रेल्वेकडून योग्य मोबदला मिळेल अशीही चर्चा आहे. मात्र त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

