- Home
- India
- Bank Strike Alert : उद्या बँकांचा देशव्यापी संप! सलग चौथ्या दिवशी कामकाज 'शटडाऊन'; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
Bank Strike Alert : उद्या बँकांचा देशव्यापी संप! सलग चौथ्या दिवशी कामकाज 'शटडाऊन'; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?
Bank Strike Alert : २७ जानेवारी २०२६ रोजी '५-डे वर्किंग'च्या मागणीसाठी सरकारी बँक कर्मचारी देशव्यापी संपावर जात आहेत. या संपामुळे सलग चार दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार असून, शाखांमधील व्यवहार, चेक क्लिअरन्स आणि एटीएम सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

उद्या बँकांचा देशव्यापी संप!
Banking News : जर तुमची बँकेची काही महत्त्वाची कामे प्रलंबित असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. उद्या, मंगळवार २७ जानेवारी २०२६ रोजी देशभरातील सरकारी बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे आधीच बँका बंद होत्या, त्यात आता या संपाची भर पडल्याने सलग चौथ्या दिवशी बँकिंग सेवा ठप्प राहणार आहेत.
बँक कर्मचारी संपावर का जात आहेत?
'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' (UFBU) ने हा संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी '५-डे वर्किंग' (आठवड्यात पाच दिवस काम) ही आहे. मार्च २०२४ मध्ये इंडियन बँक्स असोसिएशनसोबत झालेल्या करारात सर्व शनिवार सुट्टी देण्याचे मान्य झाले होते, मात्र सरकारने अद्याप त्याची अधिकृत अधिसूचना काढलेली नाही. याच दिरंगाईविरोधात बँक कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
सर्वसामान्यांची कोठे अडवणूक होणार?
शाखांमधील व्यवहार बंद: पैसे भरणे, काढणे, चेकबुक मिळवणे किंवा केवायसी (KYC) अपडेट करणे यांसारखी कामे होणार नाहीत.
चेक क्लिअरन्स रखडणार: सरकारी बँका बंद असल्याने चेक क्लिअर व्हायला २ ते ३ दिवसांचा विलंब होऊ शकतो.
ATM मध्ये खडखडाट: सलग ४ दिवस बँका बंद असल्याने एटीएममधील रोख रक्कम संपण्याची दाट शक्यता आहे.
कर्ज प्रक्रिया: होम लोन किंवा इतर कर्जांच्या कागदपत्रांची कामे रखडणार आहेत.
तुम्हाला कोठे दिलासा मिळेल?
१. खासगी बँका सुरू: HDFC, ICICI, Axis यांसारख्या खासगी बँका नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
२. डिजिटल पेमेंट: UPI (Google Pay, PhonePe), नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा २४ तास सुरू राहतील.
३. ऑनलाइन ट्रान्सफर: NEFT, RTGS आणि IMPS द्वारे तुम्ही पैसे पाठवू शकाल.
महत्त्वाचा सल्ला
उद्या सरकारी बँकांचे पूर्णतः 'शटडाऊन' असल्याने, शक्य असल्यास तुमचे व्यवहार आजच डिजिटल माध्यमांतून उरकून घ्या. रोख रकमेची गरज भासल्यास आजच जवळच्या एटीएममधून पैसे काढून ठेवणे फायदेशीर ठरेल.

