- Home
- Utility News
- Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाची खास भेट! 'लाडकी बहीण' योजनेच्या रकमेत वाढ कधी होणार?, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाची खास भेट! 'लाडकी बहीण' योजनेच्या रकमेत वाढ कधी होणार?, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या निधीत वाढ करण्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना सातत्याने आधार देण्यात येणार असून, योग्य वेळी निधीत वाढ केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मुंबई : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी मोठी घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना दरमहा थेट आर्थिक सहाय्य दिलं जातं. निवडणुकीपूर्वी या योजनेच्या रकमेबाबत वाढीची आश्वासने दिली गेली होती, मात्र प्रत्यक्षात ती वाढ अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी निधी वाढीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.
"लाडकी बहिणींसाठी आमचा प्रयत्न सुरूच राहणार"
एक कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “लाडक्या बहिणींसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. मात्र काही ‘सावत्र भावांनी’ कोर्टात जाऊन अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, पण या योजनेत सरकारकडून थेट लाभार्थीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. यात भ्रष्टाचार नाही, भ्रष्टाचार त्यांच्या डोक्यात आहे.”
ते पुढे म्हणाले, “या योजनेचा खरा आणि प्रामाणिक लाभ घेणाऱ्या भगिनींना आम्ही सातत्याने आधार देणार आहोत. शेवटी भाषणं देणं सोपं असतं, पण कृती करणं महत्त्वाचं असतं आणि हे आपल्यातील माता-भगिनी समजू शकतात. म्हणूनच सख्ख्या भावांनाच बहिणींचे आशीर्वाद लाभतात.”
"योग्य वेळ येताच निधी वाढवणार"
फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीवर आधारित ‘लाडकी बहीण’ योजना आमच्यासाठी महत्त्वाची आहे. काहींना वाटलं होतं की ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, पण निवडणुकीनंतरही ती सुरू ठेवली आहे आणि पुढील पाच वर्षांसाठी ती सुरूच राहील. याशिवाय, योग्य वेळी या योजनेच्या निधीतही वाढ केली जाईल.”
"काही ‘हुशार’ पुरुषांनी केला दुरुपयोग"
मुख्यमंत्री फडणवीस यांनी योजनेच्या दुरुपयोगावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, “काही पुरुष इतके 'हुशार' निघाले की त्यांनी महिलांच्या नावाने अर्ज भरले आणि लाभ घेण्यास सुरुवात केली. मात्र अशा प्रकरणांवर सरकार लक्ष ठेवून आहे आणि यंत्रणा यावर कारवाई करणार आहे.”
