गूळ, मध आणि कोकोनट शुगर हे पांढऱ्या साखरेपेक्षा आरोग्यदायी पर्याय मानले जातात. पण खरंच त्यांचे काही फायदे आहेत का? पोषण तत्त्वे, रक्तातील साखरेवर होणारा परिणाम आणि सर्वोत्तम पर्याय जाणून घ्या.

पांढऱ्या साखरेऐवजी गूळ, मध आणि कोकोनट शुगर यांसारखे नैसर्गिक गोड पदार्थ वापरणे अनेकदा आरोग्यदायी मानले जाते. लोक आता रिफाइंड साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी घरी बनवलेल्या मिठाया, कॉफी आणि स्मूदीज यांसारख्या पदार्थांमध्ये हे नैसर्गिक गोड पदार्थ वापरतात. या तिन्ही पदार्थांची चव आणि त्यातील पोषक तत्त्वे वेगळी असली, तरी त्यांचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो असे म्हणणे चुकीचे ठरेल.

नैसर्गिक म्हणजे नेहमीच आरोग्यदायी नव्हे

पांढऱ्या साखरेतून कॅलरीज मिळतात, पण त्यातून जीवनसत्त्वे किंवा खनिजे मिळत नाहीत. उसाच्या रसापासून मिळणाऱ्या गुळात पोटॅशियम आणि लोह यांसारखी काही खनिजे असतात. मधात आणि कोकोनट शुगरमध्ये काही अँटीऑक्सिडंट्स आणि वनस्पतीजन्य संयुगे असतात.

तरीही, या पोषक तत्त्वांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे पांढऱ्या साखरेऐवजी हे गोड पदार्थ वापरल्याने आपला आहार अधिक आरोग्यदायी झाला आहे, याची शाश्वती देता येत नाही.

रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

सर्व गोड पदार्थांमध्ये शर्करा असते, जी रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. मधात प्रामुख्याने ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते, तर गुळात प्रामुख्याने सुक्रोज असते. कोकोनट शुगरमध्येही सुक्रोजचे प्रमाण लक्षणीय असते.

जरी ग्लायसेमिक इंडेक्स रचना आणि प्रमाणानुसार बदलत असला, तरी रक्तातील साखरेच्या पातळीसाठी ते खात्रीशीर पर्याय मानले जाऊ नयेत. मधुमेह किंवा प्रीडायबेटिस असलेल्या रुग्णांनी हे नैसर्गिक पदार्थ मुक्तपणे खाऊ शकतो असा विचार करण्याऐवजी, ते किती कर्बोदके खात आहेत यावर लक्ष देणे आवश्यक आहे.

वजन आणि हृदयाच्या आरोग्याविषयी काय?

रिफाइंड साखरेच्या अतिसेवनाने कॅलरीज वाढतात आणि अतिरिक्त कॅलरीजमुळे वजन वाढणे आणि चयापचयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. नैसर्गिक गोड पदार्थांमध्येही कॅलरीज असतात आणि त्यांचा अतिवापर केल्यास वजन कमी करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरू शकते.

मध, गूळ आणि कोकोनट शुगर कमी प्रसंस्कृत वाटत असले तरीही, शरीराला त्यातील शर्करेवर प्रक्रिया करावीच लागते. गोड पदार्थ नैसर्गिक आहे की नाही यापेक्षा तुम्ही किती प्रमाणात त्याचे सेवन करता, हे अधिक महत्त्वाचे आहे.

अधिक चांगला पर्याय कसा निवडावा?

साखर बदलण्याऐवजी गोडवा कमी करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. चहा, कॉफी आणि घरी बनवल्या जाणाऱ्या गोड पदार्थांमधील साखरेचे प्रमाण कमी करण्यास सुरुवात करा. ताजी फळे देखील गोड असतात आणि त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. त्यामुळे विविध पदार्थांमध्ये हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

जर तुम्ही चवीसाठी गूळ, मध किंवा कोकोनट शुगर यांसारखे नैसर्गिक गोड पदार्थ वापरत असाल, तर त्यांचा वापर कमी प्रमाणात करा आणि अतिरिक्त साखरेच्या गणनेत त्यांचा समावेश करा.

थोडक्यात सांगायचे तर, नैसर्गिक गोड पदार्थांच्या चवी वेगवेगळ्या असू शकतात आणि काही किरकोळ पौष्टिक फरक असू शकतात; तथापि, ते पांढऱ्या साखरेपेक्षा नेहमीच आरोग्यदायी नसतात. त्यामुळे आहारातील साखरेचे एकूण प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करणे सर्वात महत्त्वाचे आहे.

-हा लेख सुश्री चित्रा बीके, आहारतज्ज्ञ, किम्स हॉस्पिटल्स, इलेक्ट्रॉनिक सिटी, बंगळुरू यांनी लिहिला आहे.