India GDP : जीडीपी म्हणजे काय? भारताचा जीडीपी किती? तो वाढल्यास नेमकं काय होतं?
GDP: कोणत्याही देशासाठी जीडीपी खूप महत्त्वाचा असतो. तो देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवतो. भारताचा जीडीपी किती आहे माहिती आहे का? तो कसा मोजतात? ही सगळी माहिती सोप्या भाषेत नक्की वाचा.

जीडीपी म्हणजे काय?
एखाद्या देशात ठराविक काळात (सामान्यत: वर्षभर किंवा तीन महिन्यांत) उत्पादित वस्तू आणि पुरवलेल्या सेवांचे एकूण बाजारमूल्य म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादन (GDP) होय. देश किती प्रगती करत आहे? तिथे व्यवसाय कसे चालले आहेत? लोकांची खरेदी क्षमता कशी आहे? अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी जीडीपी हे महत्त्वाचे परिमाण आहे. देशाच्या सीमेअंतर्गत एका विशिष्ट काळात उत्पादित वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य म्हणजे जीडीपी. तो सहसा दर तीन महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा मोजला जातो. उदाहरणार्थ, आपल्या देशात तयार होणाऱ्या कार, कपडे, अन्नपदार्थ, आयटी सेवा, बँकिंग सेवा अशा सगळ्यांचे मूल्य एकत्र करून जीडीपीचा अंदाज लावला जातो. यातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि विकास कसा आहे ते समजते.

जीडीपीचे दोन प्रकार
जीडीपीचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात.
- पहिला नॉमिनल जीडीपी (Nominal GDP). यामध्ये वस्तू आणि सेवांच्या सध्याच्या बाजारभावानुसार मोजणी केली जाते.
- दुसरा रिअल जीडीपी (Real GDP). यात महागाईचा प्रभाव काढून मोजणी करतात. त्यामुळे देशातील उत्पादन खरंच किती वाढलं आहे हे जाणून घेण्यासाठी रिअल जीडीपी उपयोगी पडतो. भारतात जीडीपीचे अंदाज केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) जाहीर करते. सामान्यत: दर तीन महिन्यांनी जीडीपीची आकडेवारी जाहीर केली जाते. वर्षभराचे अंदाजही प्रसिद्ध केले जातात.
आपल्या देशाचा जीडीपी किती आहे?
आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये सेवा क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि कृषी क्षेत्राचा मोठा वाटा असतो. आयटी, बँकिंग, वाहतूक आणि व्यवसाय सेवा या सेवा क्षेत्रात येतात. कारखाने आणि बांधकाम औद्योगिक विभागात येतात. तर पीक लागवड, पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन हा कृषी क्षेत्राचा भाग आहे. जीडीपी वाढल्यास व्यवसायांचा विस्तार होणे, गुंतवणूक वाढणे आणि रोजगाराच्या संधी सुधारण्याची शक्यता असते.
पण जीडीपी कमी झाल्यास व्यवसायांचे उत्पन्न कमी होणे आणि बेरोजगारी वाढण्याचा धोका असतो. मात्र, जीडीपी वाढला म्हणजे सर्व लोकांचे उत्पन्न वाढले असे नाही. गरिबी, शिक्षण, आरोग्य आणि जीवनमान जाणून घेण्यासाठी इतर आकडेवारीही पहावी लागते.
सध्या आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताचा जीडीपी (GDP) 346.36 लाख कोटी रुपये आहे. हे 346.36 लाख कोटी रुपये नॉमिनल जीडीपी आहे. महागाईचा प्रभाव वगळलेला रिअल जीडीपी 323.12 लाख कोटी रुपये आहे.
