रेल्वेतून प्रवास करताना तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार असून तिकीट बुकिंग सिस्टम अधिक पारदर्शक होणार आहे. 

मुंबई : रेल्वेतून लाखो प्रवासी लांब पल्ल्याचा प्रवास करतात. अनेकदा ट्रेनचं तिकीट बुक करताना सीट उपलब्ध नसते, अशावेळी प्रवाशांसाठी तात्काळ तिकीट हा ट्रेनमध्ये जागा मिळवण्यासाठीचा शेवटचा पर्याय ठरतो. मात्र, तात्काळ तिकीटाचं बुकिंग सुरू झालं, की काही सेकंदातच सीट संपून जातात. तात्काळ तिकीटाचा हा पर्यायही मग प्रवाशांसाठी उरत नाही. ही समस्या लक्षात घेता रेल्वेने प्रवाशांसाठी बुकिंग प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. रेल्वे आणि आयआरसीटीसीने तात्काळ तिकीट बुकिंगसाठी केलेले हे बदल प्रवाशांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नव्या नियमामुळे तात्काळ ऑनलाईन बुकिंग अधिक पारदर्शक

रेल्वेच्या नव्या नियमाचा उद्देश बनावट बुकिंग तसंच एजंट्सच्या मनमानी कारभाराला आळा घालणं आहे. आता तात्काळ तिकीट बुक करताना प्रवाशांना आधार-आधारित पडताळणी करावी लागणार आहे. या आधारच्या प्रक्रियेमुळे रेल्वे तिकीट बुकिंग सिस्टम अधिक सुरक्षित होण्यासह पारदर्शक होईल. तसंच एजंट्सच्या मनमानीला आळा घालून खऱ्या प्रवाशांना तात्काळ तिकीटाचा लाभ घेता येईल.

कसं कराल तात्काळ तिकीट बुक?

नव्या नियमानुसार, आता तात्काळ तिकीट बुक करताना केवळ आयआरसीटीसी अकाऊंट असणं पुरेसं ठरणार नाही. आता आधारची पडताळणी केली जाईल. तात्काळ तिकीट बुक करताना आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी दिल्यानंतरच तात्काळ तिकीटाची प्रक्रिया पुढे जाईल. या प्रक्रियेमुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. एजंट्स एकावेळी अनेक बनावट आयडी वापरुन तिकीट बुक करतात. पण आता आधार लिंक आणि ओटीपीमुळे एकाच व्यक्तीकडून बनावट आयडी तयार करुन तिकीट बुक करण्याच्या प्रकरणाला आळा बसेल. खऱ्या प्रवाशांना तिकीट बुकिंगची चांगली संधी मिळेल.प्रवाशांना तिकीट बुक करण्याआध IRCTC अकाऊंट आधारशी लिंक करा. तुमचा मोबाईल नंबरही आधारशी लिंक असणं गरजेचं आहे.