तुमच्याकडे 50 लाख रुपये असतील तर घर खरेदी करावी की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी, असा प्रश्न अनेकांना पडतो.
मुंबई : समजा तुमच्याकडे पहिल्यांदाच 50 लाख रुपयांची बचत जमा झाली. तर तुमच्या मनात पहिला प्रश्न कोणता येईल? या पैशातून घर घ्यायचं की म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची? याचं उत्तर तुम्ही घर कशासाठी खरेदी करत आहात यावर अवलंबून आहे, असं आर्थिक तज्ज्ञ सांगतात. स्वतः राहण्यासाठी घर घेणं आणि गुंतवणुकीसाठी प्रॉपर्टी घेणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
50 लाख कुठे गुंतवावेत?
ऍटम फायनान्शियल सर्व्हिसेस ग्रुपचे सीईओ आणि संस्थापक हर्ष वर्धन व्ही.एम. यांच्या मते, 50 लाख रुपये लिक्विड म्युच्युअल फंडासारख्या पर्यायांमध्ये गुंतवणे जास्त हुशारीचे आहे, जिथे गरज पडल्यास पैसे सहज काढता येतात. ही रक्कम घर खरेदीसाठी वापरू नये. या दोन गुंतवणुकींची तुलना करणं हीच एक मोठी चूक आहे, असं ते म्हणतात. त्यांनी हे एका गणितातून स्पष्ट केलं आहे.
प्रॉपर्टीमधील गुंतवणूक (वार्षिक 7% वाढ)
जर तुम्ही 50 लाख रुपये वार्षिक 7% वाढीच्या दराने प्रॉपर्टीमध्ये गुंतवले, तर 5 वर्षांनी त्याचं मूल्य 70 लाख रुपये होईल. 10 वर्षांनी ही रक्कम 98 लाख रुपये आणि 15 वर्षांनी 1.38 कोटी रुपये होईल. 20 वर्षांनंतर तुमची गुंतवणूक 1.93 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक (वार्षिक 12% वाढ)
याउलट, जर तुम्ही हेच 50 लाख रुपये वार्षिक 12% वाढीच्या दराने इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवले, तर 5 वर्षांत ते 88 लाख रुपये होतील. 10 वर्षांनी ही रक्कम 1.55 कोटी रुपये आणि 15 वर्षांनी 2.74 कोटी रुपये होईल. 20 वर्षांनंतर तुमची एकूण संपत्ती 4.82 कोटी रुपयांवर पोहोचेल.
दोन्ही गुंतवणुकींमधील फरक
या दोन्ही गुंतवणुकींमधील परताव्याचा फरक पाहिला, तर 5 वर्षांनंतर म्युच्युअल फंडात प्रॉपर्टीपेक्षा 18 लाख रुपये जास्त मिळतील. 10 वर्षांनंतर हा फरक 57 लाख रुपयांवर पोहोचेल आणि 15 वर्षांनंतर तो 1.36 कोटी रुपये होईल. 20 वर्षांच्या अखेरीस, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक प्रॉपर्टीपेक्षा तब्बल 2.89 कोटी रुपयांनी जास्त असेल.
गुंतवणुकीसाठी घर घेतल्यास काय अडचणी येतात?
केवळ गुंतवणूक म्हणून प्रॉपर्टी खरेदी करताना अनेक आव्हानं येतात, असं नियो मनीचे (Niyo Money) संस्थापक हर्ष सोनी सांगतात. भाड्याने देण्यासाठी किंवा किंमत वाढल्यावर विकण्यासाठी फ्लॅट खरेदी करताना अनेकजण चुकतात. शहरांमध्ये भाड्यातून वर्षाला फक्त 2-3% परतावा मिळतो. शिवाय, प्रॉपर्टी विकायला काढल्यावर ती लगेच विकली जात नाही. स्टॅम्प ड्युटी, ब्रोकरेज आणि मेंटेनन्सचा खर्च आपल्या नफ्यातील मोठा हिस्सा कमी करतो, असंही ते सांगतात.
स्वतः राहण्यासाठी घर घेणे चुकीचे आहे का?
तज्ज्ञांच्या मते, घर खरेदी पूर्णपणे टाळावी असं अजिबात नाही. स्वतःच्या कुटुंबासाठी घर खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरू शकते. जर तुमचे उत्पन्न आणि बचत स्थिर असेल, तर कुटुंबाला राहण्यासाठी घर खरेदी करणे हा कधीही चुकीचा निर्णय नाही. पण 50 लाख रुपये डाऊन पेमेंट भरून घर घेतल्यास, उरलेल्या रकमेसाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. 8.5% ते 9.5% व्याजदराने कर्ज घेतल्यास, तुमच्यावर 1.2 कोटी ते 1.5 कोटी रुपयांपर्यंतचं मोठं आर्थिक ओझं येऊ शकतं.


