सध्या सगळीकडे ऑनलाइन पेमेंटचा जमाना आहे. खिशात नोटा आणि नाणी ठेवणं आता खूप कमी झालंय. तरीही काहींच्या घरात ५० पैशांची जुनी नाणी सापडतात. ही नाणी आता चालतात का आणि त्याचं काय करायचं?
मुंबई : एक काळ असा होता जेव्हा ५० पैशांत दुकानातून बऱ्याच गोष्टी मिळायच्या. पण आता या ५० पैशांना फारशी किंमत उरलेली नाही. त्यामुळे ५० पैशांची नाणी आता सहसा दिसत नाहीत. पण तुमच्या घरातील जुन्या कपाटात किंवा बॅगेत ५० पैशांची नाणी सापडली, तर त्याचं काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे का?
५० पैशांचं नाणं आजही चालतं का?
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ५० पैशांचं नाणं आजही कायदेशीररीत्या वैध आहे का, हे तुम्हाला माहीत असायला हवं. आरबीआयच्या (RBI) माहितीनुसार, ५० पैशांचं नाणं आजही चलनात आहे. सरकारने जारी केलेली ५० पैसे, १ रुपया, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांची विविध डिझाईनची नाणी आजही कायदेशीर चलन (Legal Tender) आहेत. पण २५ पैसे आणि त्याहून कमी मूल्याची नाणी ३० जून २०११ पासून चलनातून बाद करण्यात आली आहेत.
५० पैशांचा वापर कसा करू शकता?
याबाबत एक महत्त्वाचा नियम आहे. आरबीआयच्या नियमानुसार, तुम्ही एका व्यवहारात ५० पैशांची नाणी देऊन जास्तीत जास्त १० रुपयांपर्यंतचं पेमेंट करू शकता. म्हणजेच, तुमच्याकडे ५० पैशांची २० नाणी असतील, तर त्याचं एकूण मूल्य १० रुपये होतं. या मर्यादेपर्यंत ती नाणी कायदेशीर आहेत. यापेक्षा जास्त रकमेची ५० पैशांची नाणी कुणी स्वतःच्या इच्छेने स्वीकारू शकतं. पण ती नाणी घेण्यासाठी तुम्ही कोणावरही सक्ती करू शकत नाही.
५० पैशांची नाणी असतील तर काय करावं?
आजकाल दुकानात ५० पैशांची नाणी चालवणं थोडं कठीण जाऊ शकतं. पण याचा अर्थ त्या नाण्याची किंमत संपली असा होत नाही. तुमच्याकडे ५० पैशांची भरपूर नाणी असतील, तर तुम्ही ती बँकेत जमा करू शकता किंवा ती बदलून घेऊ शकता. आरबीआयच्या नियमांनुसार, बँकेच्या शाखांमध्ये नाणी स्वीकारण्याची व्यवस्था असलीच पाहिजे. कमी मूल्याच्या नोटा किंवा नाणी घेण्यास बँका नकार देऊ शकत नाहीत. तसंच, बँकेत नाणी जमा करण्यासाठी कोणतीही कमाल मर्यादा ठरवलेली नाही. त्यामुळे तुमच्याकडे ५० पैशांची नाणी सापडली, तर ती फेकून देऊ नका.

