EPFO Money : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) आयटी विभागात अनेक वर्षांपासून भरती झालेली नाही. याच कर्मचाऱ्यांच्या तीव्र तुटवड्यामुळे ऑनलाईन सेवांना उशीर होत असल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली : तुमचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) ऑनलाईन क्लेम किंवा इतर कामं आठवडे किंवा महिनेभर रखडतात का? यामागे नेमकं काय कारण आहे, याचा खुलासा अखेर झाला आहे. विशेष म्हणजे, EPFO मधील अधिकाऱ्यांनीच ही समस्या सोडवण्यासाठी थेट सरकारला पत्र लिहिलं आहे.
EPF ऑफिसर्स असोसिएशनने (EPF Officers Association) कामगार आणि रोजगार मंत्रालयाला पत्र लिहून संस्थेत तातडीने आयटी तज्ज्ञ (IT Experts) आणि इतर व्यावसायिक कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी केली आहे. सध्या संस्थेत कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे, ज्यामुळे डिजिटल सेवा आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांवर गंभीर परिणाम होत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.
मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्यांच्या संघटनेने म्हटलं आहे की, एका मजबूत आयटी टीमशिवाय EPFO सारखी मोठी आणि आधुनिक संस्था चालवणं खूप अवघड आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, EPFO च्या माहिती सेवा विभागात (Information Services Division - ISD) गेल्या अनेक वर्षांपासून एकही नवीन भरती झालेली नाही. या विभागात शेवटची थेट भरती २००४ साली झाली होती, हे विशेष.
आयटी विभागात अगदीच कमी मनुष्यबळ
ISD विभागातील अनेक जॉइंट डायरेक्टर (Joint Directors) आणि डेप्युटी डायरेक्टर (Deputy Directors) एकतर निवृत्त झाले आहेत किंवा त्यांनी नोकरी सोडली आहे. पण त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. इतकंच नाही, तर गेल्या तीन वर्षांपासून EPFO ला पूर्णवेळ मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer - CTO) सुद्धा मिळालेला नाही.
यामुळे संपूर्ण आयटी विभाग अगदी मोजक्या संसाधनांवर काम करत आहे. सॉफ्टवेअर (Software) बनवण्यासाठी बाहेरच्या एजन्सींची मदत घेणं योग्य असलं, तरी EPFO मध्येच चांगले तांत्रिक तज्ज्ञ नसतील, तर त्या सॉफ्टवेअरची गुणवत्ता तपासणं आणि त्यावर देखरेख ठेवणं शक्य होत नाही. यामुळेच ऑनलाईन सिस्टीममध्ये तांत्रिक अडचणी वाढत असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
फिल्ड ऑफिसवरील कामाचा ताण वाढला
जेव्हा ऑनलाईन क्लेम वेळेवर होत नाहीत, तेव्हा फिल्ड ऑफिसमध्ये (Field Offices) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तक्रारींचा प्रचंड दबाव येतो. ऑनलाईन तक्रार पोर्टल, सोशल मीडिया आणि थेट ऑफिसमध्ये येणाऱ्या लोकांच्या तक्रारी सांभाळणं कर्मचाऱ्यांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. यामुळे त्यांच्या कामाचा ताण सतत वाढत आहे.
याशिवाय, EPFO मध्ये गरजेनुसार कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याकडेही लक्ष दिलेलं नाही. शेवटचं २०१६-१७ मध्ये कामाच्या ताणाचं मूल्यांकन झालं होतं. पण आजही अनेक ऑफिस २००८ साली ठरवलेल्या कर्मचारी संख्येवरच चालत आहेत. मुंबई, दिल्ली, बंगळूरु आणि गुरुग्रामसारख्या मोठ्या शहरांमधल्या EPFO ऑफिसवर तर कामाचा प्रचंड ताण आहे.
वेळेवर आयटी तज्ज्ञांची भरती झाली नाही, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली नाही आणि डिजिटल सिस्टीम मजबूत केली नाही, तर येत्या काळात EPFO च्या सेवांवर आणखी गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा असोसिएशनने दिला आहे. त्यामुळे सरकारने यावर तातडीने पावलं उचलावीत, अशी विनंती करण्यात आली आहे.

