जुलै २०२६ च्या सब-4 मीटर SUV सेगमेंटमध्ये टाटा पंचने पुन्हा एकदा पहिलं स्थान मिळवलं आहे. पण खरी स्पर्धा दुसऱ्या स्थानासाठी होती, जिथे मारुती फ्रॉन्क्सने टाटा नेक्सॉनला मागे टाकलं. तर, मारुती ब्रेझाच्या विक्रीत घट झाली आहे.
मुंबई : भारतातील सब-4 मीटर SUV आणि कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर सेगमेंटमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक महिन्यात विक्रीचे आकडे बदलत आहेत. जुलै २०२६ च्या आकडेवारीनुसार, टाटा पंचने आपलं पहिलं स्थान कायम ठेवलंय, तर मारुती फ्रॉन्क्सने टाटा नेक्सॉनला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
टाटा पंच पुन्हा एकदा 'किंग'
जुलै २०२६ मध्ये टाटा पंचच्या तब्बल २१,३१३ युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात १०,७८५ गाड्या विकल्या गेल्या होत्या. म्हणजेच, पंचच्या विक्रीत थेट ९७.६ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. या सेगमेंटमधील एकूण विक्रीपैकी १८.३ टक्के वाटा एकट्या पंचचा आहे.
फ्रॉन्क्सचा मोठा उलटफेर
मारुती सुझुकी फ्रॉन्क्सने जुलै २०२६ मध्ये १९,४७३ युनिट्स विकून दुसरं स्थान मिळवलं. जुलै २०२५ मध्ये फ्रॉन्क्सचे १२,८७२ युनिट्स विकले गेले होते, ज्याच्या तुलनेत ही ५१.३ टक्क्यांची वाढ आहे. फ्रॉन्क्सने टाटा नेक्सॉनला मोठ्या फरकाने मागे टाकलं आहे. नेक्सॉनच्या १७,४७१ युनिट्सची जुलैमध्ये विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत नेक्सॉनच्या विक्रीत ३६.२ टक्के वाढ झाली असली तरी, तिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. नेक्सॉनचा बाजारातील वाटा १५ टक्के आहे.
ब्रेझाच्या विक्रीला ब्रेक
मारुती ब्रेझाला मात्र जुलै महिन्यात विक्रीत मोठा फटका बसला. जुलै २०२५ मध्ये १४,०६५ युनिट्स विकल्या गेल्या होत्या, पण यावर्षी हा आकडा १२,०५५ युनिट्सवर आला. म्हणजेच, ब्रेझाच्या विक्रीत वार्षिक १४.३ टक्क्यांची घट झाली आहे. विशेष म्हणजे, काही काळापूर्वीच ब्रेझाला टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन, नवीन डिझाइन आणि फीचर्ससह अपडेट मिळालं होतं.
टॉप ५ मध्ये ह्युंदाई वेन्यू
ह्युंदाई वेन्यूने ११,०९५ युनिट्सच्या विक्रीसह पाचवं स्थान पटकावलं. गेल्या वर्षीच्या ८,०५४ युनिट्सच्या तुलनेत वेन्यूने ३७.८ टक्क्यांची वाढ नोंदवली. यानंतर महिंद्रा XUV 3XO (९,४२९ युनिट्स) सहाव्या, किया सोनेट (८,९१३ युनिट्स) सातव्या आणि ह्युंदाई एक्सटर (६,८१० युनिट्स) आठव्या स्थानावर आहे. स्कोडा कायलाक (३,७२७ युनिट्स) आणि टोयोटा टायसर (२,४७० युनिट्स) यांनी अनुक्रमे नववं आणि दहावं स्थान मिळवलं.
जुलै २०२६ मधील टॉप १० मॉडेल्स
टाटा पंच – २१,३१३
मारुती फ्रॉन्क्स – १९,४७३
टाटा नेक्सॉन – १७,४७१
मारुती ब्रेझा – १२,०५५
ह्युंदाई वेन्यू – ११,०९५
महिंद्रा एक्सयुवी 3XO – ९,४२९
किया सोनेट – ८,९१३
ह्युंदाई एक्सटर – ६,८१०
स्कोडा कायलाक – ३,७२७
टोयोटा टायसर – २,४७०


