आजकाल अनेक बनावट वेबसाइट्स आणि ॲप्स तुमच्या कष्टाच्या कमाईवर डल्ला मारत आहेत. एका चुकीच्या क्लिकमुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. त्यामुळे अशा फसव्या वेबसाइट्स कशा ओळखायच्या, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
Real vs Fake Websites: इंटरनेटवर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर गुन्हेगार असे प्लॅटफॉर्म बनवतात, जे दिसायला अगदी हुबेहूब खऱ्या वेबसाइट्ससारखे असतात. याद्वारे ते युझर्सची वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स किंवा पासवर्ड चोरण्याचा प्रयत्न करतात. तुमची एक छोटीशी चूकसुद्धा तुमची ओळख, पैसे आणि सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे, बनावट वेबसाइट आणि ॲप्स ओळखून ऑनलाइन सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे. सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी इथे काही सोपे आणि प्रभावी मार्ग दिले आहेत.
बनावट वेबसाइट कशी ओळखायची?
URL आणि डिझाइनकडे लक्ष द्या
बनावट वेबसाइट्स अनेकदा मूळ कंपनीच्या URL मध्ये थोडा बदल करून तयार केल्या जातात. उदाहरणार्थ, 'flipkartoffers.in' किंवा 'amaz0n-sale.co.in'. युझर्सना गोंधळात टाकून त्यांची आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी हे डिझाइन केलेलं असतं.
स्पेलिंग आणि भाषेतील चुका
खरे ब्रँड्स त्यांच्या वेबसाईटवरील मजकूर आणि डिझाइनकडे खूप लक्ष देतात. जर एखाद्या वेबसाईटवर स्पेलिंगच्या अनेक चुका, व्याकरणात चुका किंवा कमी दर्जाचे ग्राफिक्स असतील, तर ती वेबसाईट बनावट असण्याची शक्यता जास्त असते.
सुरक्षित कनेक्शन नसणे
जर वेबसाइटचा URL 'https://' ने सुरू होत नसेल आणि ब्राउझर कोणताही सुरक्षेचा इशारा देत नसेल, तर ती वेबसाइट धोकादायक असू शकते. SSL सर्टिफिकेट नसल्यामुळे तुमचा डेटा सहज चोरीला जाऊ शकतो.
अविश्वसनीय किमती आणि ऑफर्स
जर एखाद्या वेबसाइटवर प्रीमियम ब्रँड्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खूपच कमी किमतीत मिळत असतील, तर ती एक बनावट ऑफर असू शकते.
टायमर आणि अलर्टद्वारे खोटी घाई
'लवकर करा, फक्त एकच वस्तू शिल्लक आहे' असे मेसेज किंवा सतत रीसेट होणारे काउंटडाउन टायमर तुम्हाला विचार न करता निर्णय घ्यायला भाग पाडतात.
कंपनीच्या माहितीचा अभाव
कंपनीचा नोंदणीकृत पत्ता, कस्टमर केअर नंबर किंवा ईमेल आयडी यासारखी माहिती नसणं हे सुद्धा एक मोठं धोक्याचं लक्षण आहे. संपर्कासाठी Gmail किंवा Yahoo सारख्या फ्री ईमेलचा वापर केला असेल, तर ती फसवणूक असण्याची शक्यता जास्त असते.
बनावट ॲप्स कसे ओळखायचे?
- गुगल प्ले स्टोअरवरून कोणतंही ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याच्या परवानग्या (permissions) तपासा. जर ॲप गरजेपेक्षा जास्त किंवा चुकीच्या परवानग्या मागत असेल, तर ते इन्स्टॉल करणं टाळा.
- फक्त चांगल्या रिव्ह्यूजवर विश्वास ठेवू नका. फसवणूक किंवा समस्यांबद्दल माहिती देणाऱ्या खऱ्या युझर्सच्या कमेंट्सही वाचा.
- जास्त डाउनलोड्स असलेलं ॲप नेहमीच सुरक्षित असेल असं नाही. लाखो डाउनलोड्स असूनही रिव्ह्यूज खूप कमी असतील, तर सावध व्हा.
- नवीन ॲप्सवर लगेच विश्वास ठेवू नका. काही धोकादायक ॲप्स अनेक आठवड्यांपर्यंत कोणत्याही तक्रारीशिवाय ॲक्टिव्ह राहतात.
- तुमच्या अँड्रॉइड फोनवर 'गुगल प्ले प्रोटेक्ट' (Google Play Protect) नेहमी चालू ठेवा. हे फीचर ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी ते तपासतं आणि तुमच्या डिव्हाइसची नियमित सुरक्षा तपासणी करतं.


