जुनी कार विकल्यानंतर फास्टॅग (FASTag) बंद करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही हे केलं नाही, तर नवीन मालक जेव्हा टोलनाक्यावरून जाईल, तेव्हा पैसे तुमच्या बँक खात्यातून कट होतील. फास्टॅग कसा डीअॅक्टिव्हेट करायचा आणि उरलेले पैसे परत कसे मिळवायचे?
मुंबई : जुनी कार विकली, आरसी बुक आणि इतर कागदपत्रं नवीन मालकाच्या नावावर ट्रान्सफर केली की आपलं काम संपलं, असं अनेकांना वाटतं. पण इथेच लोक एक मोठी चूक करतात. ती म्हणजे कारवर लागलेला फास्टॅग (FASTag) बंद करायला विसरतात. तुम्ही जर फास्टॅग बंद केला नाही, तर तुमच्या बँक खात्यातून विनाकारण पैसे कट होत राहतील.
जुनी कार विकलीये? मग लगेच FASTag बंद करा
तुम्ही कार विकल्यानंतरही तुमचा फास्टॅग सुरूच राहिला, तर नवीन मालक जेव्हा कार घेऊन टोलनाक्यावरून जाईल, तेव्हा टोलचे पैसे तुमच्याच बँक खात्यातून कापले जातील. खात्यातून सलग पैसे कट व्हायला लागल्यावरच अनेकांना आपला फास्टॅग अजूनही सुरू असल्याचं लक्षात येतं.
फास्टॅग बंद करणं का गरजेचं आहे?
फास्टॅग हा कारच्या पुढच्या काचेवर लावलेला एक स्टिकर असतो. यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञान वापरलेलं असतं. हा टॅग तुमच्या बँक खात्याशी किंवा फास्टॅग वॉलेटशी जोडलेला असतो. जेव्हा गाडी टोलनाक्यावरून जाते, तेव्हा तिथला स्कॅनर हा टॅग स्कॅन करतो आणि टोलचे पैसे आपोआप तुमच्या खात्यातून कट होतात.
तुम्ही कार विकल्यानंतरही फास्टॅग डीअॅक्टिव्हेट केला नाही, तर ही सिस्टीम तशीच काम करत राहील. त्यामुळे नवीन मालकाने केलेल्या प्रवासाचा टोल तुमच्या खात्यातून कट होण्याची दाट शक्यता असते.
कार विकल्यावर काय करावं?
एखाद्या व्यक्तीने आपली गाडी विकली किंवा दुसऱ्याला दिली, तर जुन्या मालकाने लगेच फास्टॅग देणाऱ्या बँकेशी संपर्क साधला पाहिजे. त्यांनी आपलं फास्टॅग खातं किंवा वॉलेट बंद करून घ्यावं. त्यानंतर नवीन मालकाने स्वतःच्या नावाने नवीन फास्टॅग घेणं आवश्यक आहे.
फास्टॅगमध्ये उरलेल्या पैशांचं काय?
फास्टॅग बंद करण्यापूर्वी तुमच्या खात्यात किती बॅलन्स आहे, हे नक्की तपासा. जर खात्यात पैसे उरले असतील, तर ते परत कसे मिळवायचे, याची माहिती संबंधित बँकेकडून घ्या. प्रत्येक बँकेच्या नियमांनुसार पैसे परत मिळण्याची प्रक्रिया वेगळी असू शकते.
त्यामुळे फास्टॅग खातं बंद करण्याचा अर्ज देतानाच, उरलेले पैसे रिफंड मिळवण्याची प्रक्रिया समजून घेणं फायद्याचं ठरतं.
फास्टॅग डीअॅक्टिव्हेट कसा करायचा?
सर्वात आधी तुमचा फास्टॅग कोणत्या बँकेने दिलाय, ते तपासा. त्यानंतर त्या बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून किंवा ऑनलाइन फास्टॅग पोर्टलवर जाऊन तुम्ही खातं बंद करण्यासाठी अर्ज करू शकता.
बँकेला स्पष्ट सांगा की तुम्ही कार विकली आहे आणि तुम्हाला फास्टॅग खातं बंद करायचं आहे. बँक तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबर यासारखी माहिती मागेल. सर्व माहिती तपासल्यानंतर ते तुमचा फास्टॅग डीअॅक्टिव्हेट करतील.
अर्ज दिल्यानंतर तुमचा फास्टॅग खरोखरच बंद झालाय की नाही, याची खात्री नक्की करा. जर बँकेकडून हा प्रश्न सुटला नाही, तर फास्टॅगशी संबंधित तक्रारी आणि मदतीसाठी तुम्ही इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL) च्या हेल्पलाईनशी संपर्क साधू शकता.


