Hotel Safety: हॉटेल रूममध्ये शिरताच लाईट लावण्याआधी 'या' गोष्टी तपासा!
Hotel Safety: हॉटेलमध्ये रूम बुक करून थांबला असाल, तर रूममध्ये गेल्या गेल्या लगेच लाईट लावू नका. त्याआधी काही गोष्टींची तपासणी करणं गरजेचं आहे. चला, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Hotel Safety Tips
पर्यटनासाठी किंवा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेल्यावर अनेकजण हॉटेलमध्ये रूम बुक करतात. रूममध्ये शिरल्यावर आपली पहिली सवय असते ती म्हणजे लाईटचं बटण शोधून लाईट लावणं. पण प्रवास सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, ही सवय चुकीची आहे.
हॉटेल रूममध्ये शिरल्यावर लगेच लाईट न लावता, काही वेळ अंधारातच रूम तपासणं महत्त्वाचं आहे. यामुळे काही गंभीर गोष्टी तुमच्या सहज लक्षात येऊ शकतात.

लपवलेले कॅमेरे शोधणं सोपं होतं
आजकाल हॉटेलच्या रूममध्ये छुपे कॅमेरे लावल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे रूममध्ये शिरल्यावर दारं-खिडक्या बंद करा आणि लाईट न लावता मोबाईल कॅमेऱ्याने रूमचा प्रत्येक कोपरा तपासा.
अंधारात छुपे कॅमेरे असतील, तर त्यातून येणारा लाल रंगाचा प्रकाश तुमच्या मोबाईल कॅमेऱ्यात लहान ठिपक्यांसारखा दिसतो. यामुळे संशयास्पद उपकरणं शोधणं सोपं होतं. पण लक्षात ठेवा, या पद्धतीने सगळेच छुपे कॅमेरे शोधता येतील असं नाही.
बेडशीट आणि गादीची स्वच्छता तपासा
रूमची लाईट लावण्याआधी, मोबाईलच्या टॉर्चने बेडशीट, गादीच्या कडा आणि उशांच्या खालची बाजू तपासा. यामुळे ढेकूण, लहान किडे किंवा घाणेरडे डाग आहेत का, हे तुमच्या लगेच लक्षात येईल.
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही आधी लाईट लावली तर काही किडे गादीच्या कोपऱ्यात लपण्याची शक्यता असते. त्यामुळे अंधारात टॉर्च वापरणं जास्त फायदेशीर ठरतं.
रूम व्यवस्थित स्वच्छ आहे का?
हॉटेल रूमची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. सोफा, टेबल, दाराचं हँडल आणि बाथरूममध्ये मोबाईल टॉर्च लावून बघा. यामुळे तेलकटपणा, जुने डाग किंवा स्वच्छ न केलेल्या जागा आहेत का, हे कळेल.
जर तुम्हाला रूम स्वच्छ वाटली नाही, तर तुम्ही लगेच हॉटेल मॅनेजमेंटला सांगून दुसरी रूम घेऊ शकता.
आरशाची तपासणी करायला विसरू नका
बेडरूम किंवा बाथरूममधले आरसे एकदा तपासून घेणं चांगलं. अंधारात आरशावर टॉर्चचा प्रकाश टाका. जर तो साधा आरसा असेल, तर प्रकाश सामान्यपणे परावर्तित होईल.
पण, जर तुम्हाला तो टू-वे मिरर (two-way mirror) असल्याचा संशय आला, तर हॉटेल मॅनेजमेंटला याबद्दल नक्की विचारा. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त टॉर्च टेस्ट हा टू-वे मिरर ओळखण्याचा 100% खात्रीशीर वैज्ञानिक मार्ग नाही.

