Honda Motor Company भारतात 2030 पर्यंत 10 नवीन गाड्या लॉन्च करणार आहे, ज्यात पेट्रोल, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक मॉडेल्सचा समावेश असेल. या योजनेचा मुख्य भाग म्हणजे 2027 मध्ये येणारी 'Honda 0 Series Alpha' ही इलेक्ट्रिक SUV, जी भारतातच तयार केली जाईल.
Honda Motor Company आता भारतात आपली नवी ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने 10 नव्या गाड्या भारतीय बाजारात लॉन्च करण्याचा रोडमॅप तयार केला आहे. ज्यात ICE (पेट्रोल/डिझेल), हायब्रिड आणि इलेक्ट्रिक या तिन्ही प्रकारच्या वाहनांचा समावेश असेल.
Honda 0 Series Alpha SUV – 2027 मध्ये भारतात पदार्पण
Honda ची नवी 0 Series Alpha ही मिडसाईज इलेक्ट्रिक SUV भारत आणि जपानमध्ये 2027 मध्ये लॉन्च होणार आहे. ही गाडी Honda च्या जागतिक इलेक्ट्रिफिकेशन धोरणाचा केंद्रबिंदू ठरणार असून, भारताला कंपनीच्या पुढील वाढीच्या टप्प्यात महत्त्वाचं स्थान मिळणार आहे. जपान मोबिलिटी शो 2025 दरम्यान Honda Motor Co. चे संचालक व अध्यक्ष तोशिहिरो मिबे यांनी सांगितलं की, “Honda आता भारतीय बाजारात पूर्वीपेक्षा अधिक गुंतवणूक आणि लक्ष केंद्रीत करणार आहे.” त्यांनी भारताला जपान आणि उत्तर अमेरिकेनंतर कंपनीच्या पुढील मोठ्या विस्तार केंद्र म्हणून ओळख दिली.

भारत होणार Honda चं जागतिक उत्पादन केंद्र
Honda 0 Series Alpha ही फ्युचरिस्टिक आणि मिनिमलिस्टिक डिझाइन फिलॉसॉफीवर आधारित आहे. या इलेक्ट्रिक SUV ला एकदा चार्ज केल्यावर 500 किमी पेक्षा अधिक रेंज मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये अत्याधुनिक सॉफ्टवेअर इंटिग्रेशन आणि उच्च दर्जाचा ग्लोबल बिल्ड क्वालिटीचा समावेश असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी भारतामध्येच निर्मिती केली जाईल. त्यामुळे ती केवळ देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही निर्यात केली जाणार आहे. यामुळे भारत Honda साठी एक ग्लोबल ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग हब बनू शकतो.
डिझाईन आणि प्लॅटफॉर्म, नव्या पिढीचं तंत्रज्ञान
0 Series Alpha चे काही डिझाईन घटक Honda Elevate प्रमाणे असतील, पण ही गाडी पूर्णपणे नव्या EV प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. म्हणजेच ही गाडी विद्यमान पेट्रोल कारवरून रूपांतरित नसून, इलेक्ट्रिकसाठी खास तयार करण्यात आलेली असेल. Honda सध्या भारतात Amaze, City आणि Elevate या मॉडेल्ससह उपस्थित आहे. पण कंपनीला आता आपल्या पोर्टफोलिओत नवा उत्साह आणायचा आहे. आणि त्यासाठीच पुढील काही वर्षांत मोठी लॉन्च योजना आखण्यात आली आहे.
2030 पर्यंत येणार 10 नवीन Honda गाड्या
Honda ने 2030 पर्यंत भारतात 10 नवी वाहने सादर करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, ज्यामध्ये सात SUV मॉडेल्स असतील. यामध्ये Amaze किंवा City प्लॅटफॉर्मवर आधारित एक कॉम्पॅक्ट SUV, हायब्रिड मॉडेल्स आणि भारतीय परिस्थितीनुसार सुधारित आंतरराष्ट्रीय व्हेरिएंट्स असतील. Honda केवळ इलेक्ट्रिकवर भर न देता, हायब्रिड आणि पारंपरिक ICE मॉडेल्स यांवरही समान गुंतवणूक करत आहे.

भारतात नव्या सुरुवातीची तयारी
जरी Honda ने भारतातील SUV आणि EV विभागात थोडं उशिरा पाऊल टाकलं असलं, तरी 0 Series Alpha कंपनीसाठी एक ताजी आणि प्रभावी सुरुवात ठरू शकते. पुढील काही वर्षांत आपण नव्या जनरेशनची City, एक तीन रांगेची मिडसाईज SUV, तसेच Elevate हायब्रिड देखील पाहू शकतो. Honda आता भारतात नव्या उर्जेने पाऊल टाकत आहे. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार्सच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, कंपनीची ही योजना भारतीय ऑटो उद्योगासाठी एक गेमचेंजर ठरू शकते.


