Health Tips: होमोसिस्टीनची उच्च पातळी हे एक दुर्लक्षित कारण आहे. लाल मांस, दुग्धजन्य पदार्थ किंवा अंड्यांच्या अतिसेवनामुळे सामान्यतः होमोसिस्टीनची पातळी वाढते. छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि पोटदुखी ही ॲसिडिटीची सामान्य लक्षणे आहेत.
Health Tips: जेव्हा पोटातील ॲसिडचे संतुलन बिघडते, तेव्हा ॲसिडिटीचा त्रास होतो. हल्लीच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे रात्री उशीरापर्यंत करावे लागणारे काम, त्यामुळे होणारी अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी यामुळे ॲसिडिटीचा त्रास हा खूप कॉमन झाला आहे. अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते किंवा काहीतरी औषधे, गोळ्या स्वत:च्या मनानेच घेतल्या जातात. त्याने आराम मिळत असला तरी अनेकदा हे उपाय तात्पुरता आराम देणारे असतात. मसालेदार खाणे झाले की ॲसिडिटी होते असेही अनेकदा म्हटले जाते. पण यात तथ्य किती?
मसालेदार पदार्थ खाल्ल्याने ॲसिडिटी होते, असे अनेकांना वाटते. पण यात तथ्य आहे का? पोषणतज्ज्ञ नमामी अग्रवाल यांच्या मते, बहुतेक लोकांमध्ये ॲसिडिटीचे मुख्य कारण फक्त मसालेदार पदार्थ नसतात. त्या सांगतात की, आपल्या जीवनशैली आणि आहारात असे अनेक घटक आहेत, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.
ॲसिडिटी नेहमी आदल्या रात्री तुम्ही काय खाल्ले यावर अवलंबून नसते. कधीकधी तुमचे शरीर शांतपणे कोणत्या गोष्टींशी झगडत आहे किंवा शरीरात कशाची कमतरता आहे, यावर ते अवलंबून असते, असे नमामी अग्रवाल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.
पोषणतज्ज्ञ सांगतात की, लोहाची कमतरता केवळ थकवा किंवा अशक्तपणापुरती मर्यादित नाही. लोहाच्या कमतरतेमुळे पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे ॲसिड जमा होऊन छातीत जळजळ होऊ शकते. याशिवाय, होमोसिस्टीनची उच्च पातळी हे देखील एक दुर्लक्षित कारण आहे. लाल मांस, दुग्धजन्य पदार्थ किंवा अंड्यांच्या अतिसेवनामुळे सामान्यतः होमोसिस्टीनची पातळी वाढते, असे नमामी अग्रवाल सांगतात.
मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यामुळे स्नायूंमध्ये ताण येऊ शकतो, ज्यामुळे अस्वस्थता वाढते, असेही पोषणतज्ज्ञ सांगतात.
तणाव हे देखील ॲसिडिटीचे एक प्रमुख कारण आहे. जेव्हा तणावाची पातळी वाढते, तेव्हा शरीर जास्त कॉर्टिसोल तयार करते. जर शरीर उच्च साखरेच्या पातळीशी झगडत असेल, तर सूज वाढते आणि पोटात अतिरिक्त ॲसिड तयार होते.
छातीच्या मध्यभागी जळजळ, आंबट ढेकर, पोटदुखी/अस्वस्थता, मळमळ, उलट्या आणि गिळायला त्रास होणे ही सर्व ॲसिडिटीची लक्षणे आहेत.


